(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kalyan: अज्ञात चोरट्यांकडून घरातील दागिन्यांची चोरी, वृद्ध महिला आणि तिच्या मुलीला मारहाण
रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यानी घरात घुसून लूट केली आणि चोरीला प्रतिकार करणाऱ्या मुलीसह तिच्या वृद्ध आईला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.
कल्याण: गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अटाळी गावात अशीच एक चोरीची घटना घडली असून त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या सुमारास दोन चोरटे एका घरात शिरले व त्यांनी दागिने चोरले. चोरट्यांची चाहूल लागताच प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेसह तिच्या मुलीला बेदम मारहाण करत तेथून पळ काढला. या हल्ल्यात मायलेकी जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस तपास करत आहेत .
कल्याणनजीक अटाळी मानी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या वत्सला चिकणे यांच्या शेजाऱ्याने माघी गणेशाची स्थापना केली होती. वत्सला यांची विवाहीत मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी माघी गणपतीला आली होती. काल रात्री गणेश विसर्जनानंतर आई वत्सला आणि मुलगी सारिका व तिची दोन मुले घरात झोपले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे त्यांच्या घरात घुसले. याच दरम्यान वत्सला याना जाग आल्याने त्या उठल्या. त्यांनी या दोन्ही चोरट्यांना पाहिले आणि आरडाओरड सुरू केली. प्रतिकार करणाऱ्या वत्सला यांच्या डोक्यावर चोरट्यांनी हल्ला केला. त्या आवाजाने मुलगी सारिका जागी झाली. सारिकाने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी या दोघींना मारहाण केली आणि घरातील 13 तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन ते पसार झाले. या हल्ल्यात दोघी मायलेकी जखमी झाल्या असून त्यांच्यावर डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. खडकपाडा पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र घरात घूसून दोन महिलांना जखमी करुन लूटमारीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: