बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
कोर्टाचा निर्णय सरकारला चपराक म्हणता येणार नाही. बदलापूरमधील एन्काऊंटर प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन.
मुंबई : बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर (Encounter) करण्यात आला होता. पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलं नसल्याची टीका करत आरोपींना शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं आहे. पोलिसांकडून आरोपीचा खून करण्याच आल्याची टीकाही काहींनी केली होती. आता, याप्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल समोर आला असून बदलापूर आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलंय. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. या अहवालाच्या वृत्तानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा सरकावर टीका केली. तसेच, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असेही म्हटले. आता, याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाचा निर्णय सरकारला चपराक म्हणता येणार नाही. बदलापूरमधील एन्काऊंटर प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन. पण, महाराष्ट्र असुरक्षित असल्याची विधाने विरोधक करतात, निवडणुकीतील पराभवामुळे ते आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच, फेक एन्काऊंटर घटनेसंदर्भात आयोगाकडे कुठलीही तक्रार नाही. पण, माहिती घेऊन व्यक्ती दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्की करू. आयोगाकडे तक्रार आल्यावर कोणालाही सोडणार नाही, सगळया घटनांचा पाठपुरावा करू, सगळी महिती आता समोर आली आहे. सरकार सगळ्या गुन्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन कारवाई करत आहे, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
विरोधक राज्याला बदनाम करत आहेत
महाराष्ट्राची बदनामी हे लोक करत आहेत का, हा एक प्रश्न तर दुसरीकडे स्वतः महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारल्याचे नैराश्य, गेलेला आत्मविश्वास आणि याच्यामुळे सातत्याने अशी विधान केली जातात असं मला वाटतं, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.
कुठल्याही घटनेवर विरोधक टीका करत असतात, लोकांनी संदेश दिला आहे घरी बसा, तरीही ते असे उठसूट आरोप करतात, हे विधानं करणं चुकीचं आहे. विरोधकांना या घटनेत केवळ राजकरण करायचं आहे, राज्याला बदनाम करण्याचं काम हे लोकं करतं आहेत, असे म्हणत विरोधकांकडून सरकारवर होणाऱ्याआरोपांवरुन चाकणकर यांनी पलटवार केला आहे.
सरकार हस्तक्षेप करणार नाही - शिरसाट
बदलापूरच्या घटनेमध्ये जो अहवाल सादर केला, त्यावदर न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. जो कोणी दोषी असेल, जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घेईल. याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
माहिती घेऊन बोलतो- देसाई
शंभुराज देसाई यांनी प्रकरणी बोलण्याचे टाळले. न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात मला माहीत नाही, मी संबंधित अधिकारी यांच्यासोबत बोलून माहिती घेतो, त्यांनतर बोलतो अशी प्रतिक्रिया मंत्री देसाई यांनी दिली.