फायर गन'मधून निघालेली ठिणगी स्प्रेवर पडली अन् बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागली, वर्ध्यातील धक्कादायक घटना
Wardha News : बर्थडे सेलिब्रेशन वर्ध्यातील एका तरुणाला चांगलं लक्षात राहिल. कारण वाढदिवसाचा केक कापत असताना बर्थ डे बॉयच्या तोंडाला चक्क आग आली. या घटनेत तो किरकोळ भाजला आहे.
Wardha News : वाढदिवस (Birthday) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या. कोणी खास केक कापून वाढदिवस साजरा करतं तर कोणी वाढदिवसाचं हटके सेलिब्रेशन करतं. मात्र असंच सेलिब्रेशन वर्ध्यातील (Wardha) एका तरुणाला चांगलं लक्षात राहिल. कारण वाढदिवसाचा केक कापत असताना बर्थ डे बॉयच्या तोंडाला चक्क आग आली. या घटनेत तो किरकोळ भाजला आहे. मात्र हे सेलिब्रेशन आयुष्यभर लक्षात राहिल असंच ठरलं.
स्प्रे आणि फायर गनमुळे अपघात
सध्या वाढदिवसाला केक कापण्यासोबतच विविध स्प्रेचा आणि फायर गनचाही वापर केला जातो. वर्ध्यात काल झालेल्या एका बर्थडे पार्टीत अशाच स्प्रे आणि फायर गनचा वापर करण्यात आला. परंतु या दरम्यान दुर्घटना घडली आणि बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागली. रितीक वानखेडे असं या तरुणाचं नाव आहे. सुदैवाने या दुर्घटनेत रितीकला मोठी दुखापत झाली नाही आणि त्याच्यावर तातडीने उपचार देखील झाले.
फायर गन'मधून निघालेली ठिणगी स्प्रेवर पडली अन् बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागली
वर्ध्याच्या सिंदी मेघे इथे हा धक्कादायक प्रकार घडला. रितीक वानखेडे हा तरुण काल सायंकाळी आपल्या मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेट करत होता. यावेळी मित्रांनी त्याच्या तोंडावर स्प्रे मारला. त्याचवेळी एकाने फायर गनचा वापर केला. 'फायर गन'मधून निघालेली ठिणगी रितीक वानखेडेच्या तोंडावरील स्प्रेवर पडल्याने आग लागली. यानंतर तिथे एकच खळबळ माजली. रितीकच्या तोंडाला लागलेली आग विझवण्यात आली आणि त्याला उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बर्थडे बॉयच्या कानाला आणि नाकाला किरकोळ जखम
या घटनेत रितीक वानखेडे सुदैवाने किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर वेळीच उपचारही झाले. आगीमुळे भाजल्याने त्याच्या कानाला आणि नाकाला किरकोळ जखम झाली आहे. पण हे थोडक्यात निभावले म्हणून बरे नाहीतर होत्याचे नव्हते व्हायलाही वेळ लागली नसता.
वाढदिवसानिमित्त लावलेल्या स्पार्कल कॅण्डलचा स्फोट, दहा वर्षीय मुलगा जखमी
मागील वर्षी चंद्रपुरातील भिसी गावातही अशीच दुर्घटना घडली होती. केक कापताना त्यावर लावलेल्या "स्पार्कल कॅण्डल"चा स्फोट झाल्याने आरंभ डोंगरे या दहा वर्षाच्या मुलाच्या गालाला आणि जिभेला मोठी दुखापत झाली. पाच तासांची शस्त्रक्रिया करुन आरंभच्या चेहऱ्यावर दीडशे टाके घातल्यानंतर त्याचा गाल आणि जीभ पूर्वस्थितीत करण्यात आली.
हेही वाचा
वाढदिवसानिमित्त लावलेल्या स्पार्कल कॅण्डलचा स्फोट, 10 वर्षीय मुलाच्या गाल आणि जिभेला गंभीर दुखापत