(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वाढदिवसानिमित्त लावलेल्या स्पार्कल कॅण्डलचा स्फोट, 10 वर्षीय मुलाच्या गाल आणि जिभेला गंभीर दुखापत
वाढदिवसाचा केक कापताना त्यावर लावलेल्या स्पार्कल कॅण्डलचा स्फोट झाल्याने दहा वर्षीय मुलाच्या गालाला आणि जिभेला मोठी दुखापत झाली. पाच तासांची शस्त्रक्रिया करुन चेहऱ्यावर दीडशे टाके घातल्यानंतर त्याचा गाल आणि जीभ पूर्वस्थितीत करण्यात आली.
Sparkle Candle Blast : कोणाचा वाढदिवस म्हटला की आप्तस्वकियांसाठी तो आनंद साजरा करण्याची पर्वणी असते. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात वाढदिवसाचा हाच आनंद मोठं संकट ठरलं. केक कापताना त्यावर लावलेल्या "स्पार्कल कॅण्डल"चा स्फोट झाल्याने आरंभ डोंगरे या दहा वर्षाच्या मुलाच्या गालाला आणि जिभेला मोठी दुखापत झाली. पाच तासांची शस्त्रक्रिया करुन आरंभच्या चेहऱ्यावर दीडशे टाके घातल्यानंतर त्याचा गाल आणि जीभ पूर्वस्थितीत करण्यात आली.
वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे आप्तस्वकीय एकत्र येणे, केक कापणे, भेटवस्तूंची देवाण-घेवाण आणि आणि धम्माल मस्ती. चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात राहणारे डोंगरे कुटुंब गावातीलच आपल्या एका मित्राकडे वाढदिवसानिमित्त गेले होते. वाढदिवसाला सुरुवात झाली. स्पार्कल कॅण्डलचा झगमगाट झाला आणि केक कापण्यात आला. गमतीजमतीत जेवणं सुरु झाली. मुलं आसपास खेळत असताना आरंभ डोंगरे हा दहा वर्षाचा मुलगा विझलेल्या स्पार्कल कॅण्डलशी खेळत होता. तेवढ्यात मोठा स्फोट होतो आणि अचानक आनंदाचा प्रसंग दुःखात परिवर्तित होतो. आरंभचा उजवा गाल आणि जीभ फाटली आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थेत 50 किलोमीटर दूरवरच्या ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
एखाद्या वाढदिवसाला स्पार्कल मेणबत्ती लावणे ही अगदी सामान्य बाब आहे. अपघात झाला त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात लावलेली स्पार्कल कॅण्डल देखील व्यवस्थित पेटली, त्यातून स्पार्कल बाहेर पडले मात्र स्फोट दोन तासांनी झाला.
पाच तासांची शस्त्रक्रिया आणि दीडशे टाके
आरंभच्या गालातून आणि जिभेतून रक्तस्त्राव अधिक झाल्याने आणि वय कमी असल्याने प्रसंग बाका होता. मात्र प्लास्टिक सर्जन असलेले डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल आणि डॉ. पंकज लडके यांच्या अथक परिश्रमाने पाच तास शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आरंभला दीडशे टाके लावल्यानंतर त्याचे गाल आणि जीभ पूर्ववत आले.
एक साधी स्पार्कल मेणबत्ती किती घातक-स्फोटक ठरु शकते याची चुणूक या प्रसंगाने मिळाली आहे. उपचार वेळेत मिळाल्याने आरंभ थोडक्यात बचावला. मात्र समस्त पालकवर्गाने या घटनेतून बोध आणि काळजी घेण्याची गरज आहे.