Devendra Fadnavis : आतापर्यंतचे स्वातंत्र्य दिन फक्त सरकारी कार्यक्रमांपुरतेच मर्यादीत, यंदाचा अमृत महोत्सव प्रत्येक देशवासीयासाठी
ज्याच्याकडे आहे, त्याने ज्याच्याकडे नाही त्याला देणे ही शिकवण विनोबा भावे यांनी दिली आहे. याचे अनुकरण पंतप्रधान करत असून प्रत्येक नागरिकाला देशनिर्मितीमध्ये सामिल करणार आहे.
वर्धाः आतापर्यंत स्वातंत्र्य दिन फक्त सरकारी कार्यक्रमांपुरताच मर्यादीत होता. फक्त सरकारी अधिकारी कर्मचारी आणि शाळांमध्ये यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला सामिल करण्यात येत आहे. आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आपण कुठे आहोत याचे सिंहावलोकन करण्याची गरज असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुढे फडणीस म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक आदिवासी बांधव इग्रजांशी लढले. त्यांचा इतिहास सर्वांसमोर आला पाहीजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिरसा मुंडा यांचा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पाऊले उचलली आहे. समाजातील प्रत्येक घटक जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करेल तेव्हाच हा अमृत महोत्सव यशस्वी होईल. येणाऱ्या पिढीला इतिहास कळावे म्हणून पूर्वी राजे विजय स्तंभ तयार करायचे. येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपल्याला इतिहास पोहोचवायचा असल्याचेही यावेळी फडणवीस म्हणाले.
देशातील सर्वाधिक तलावनिर्मिती महाराष्ट्रात करु
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात 75 अमृत सरोवर निर्माण करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव तयार करण्यात येतील. यापेक्षाही जास्त तलाव आपण महाराष्ट्रात तयार करणार असल्याचा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापासून आपण 100 वर्ष पुढे जाताना तो मार्ग कसा असावा हे आपण अमृत महोत्सवानिमित्त ठरवतो असल्याचेही ते म्हणाले.
विनोबांची शिकवण
ज्याच्याकडे जास्त आहे त्याने ज्याच्याकडे नाही त्याला देणे ही शिकवण आपल्याला विनोबा भावे यांनी दिली आहे. त्याचे अनुकरण पंतप्रधान करत असून ज्यांना गरज नाही अशा 1.5 कोटी लोकांनी गॅसची सबसिडी सोडली. यामुळेच गॅस कनेक्शन नसलेल्या 3 कोटी लोकांना गॅस मिळू शकले आहे. याप्रकारे समाजात वावरण्याची गरज असल्याचेही यावेळी फडणवीस म्हणाले.
आम्ही बापूंमुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवतोय
वर्धाः आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बापूंमुळेच अनुभवतो आहोत. बापूंबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातूनच शक्य आहे. सर्व समावेशक आणि मानवी चेहरा असलेला विकास, समता अर्धीष्टीत समाज रचना सर्वांना संधीची समानता, सर्व विचार आणि पूजा पद्धती बाबत भाव हाच आपला मूलमंत्र आहे. आज देशात राबवला जात असलेला गरीब कल्याण अजेंडा म्हणजे बापूंनी सांगितलेली 'दारिद्र नारायणाची सेवा' असल्याचा अभिप्राय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम येथील बापू कुटी भेटी दरम्यान लिहीला.