Ind vs Pak: आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? भारत-पाक सामन्यावरुन ठाकरेंचा संताप, शिवसैनिकांना आदेश
Ind vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावर बहिष्काराची मागणी करण्यात येत होती. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झालं.

मुंबई : आशिया क्रिकेट चषकात एकीकडे भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामन्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारला सवाल केल आहे. तर, आदित्य ठाकरे यांनीही भाजपवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची मातोश्रीवर बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावनांशी खेळ केल्याचे सांगत भारत विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्यावर भाष्य केलं.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावर बहिष्काराची मागणी करण्यात येत होती. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झालं. त्या हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा बळी गेला होता. त्यामुळे, भारतात पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त होत असून भारत पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना नको, अशी भूमिकाही काही राजकीय नेत्यांनी घेतली आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटानेही स्पष्ट भूमिका घेत भाजप आणि मोदी सरकावर हल्लाबोल केला.
पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे मोदी म्हणाले. पण, आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच, सामन्यादिवशी येत्या 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा, महिला आघाडीने पंतप्रधानांना सिंदूर पाठवावा, असेही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी रात्री 8. वाजता क्रिकेट सामना रंगणार असून दुबईच्या मैदानावर क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वण असणार आहे. मात्र, या सामन्यावरुन राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
मतदार यादीतील घोळाकडे लक्ष द्या (Voter list)
जिल्हा परिषद, नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा, निवडणुका कधीही लागू शकतात. स्थानिक पातळीवर आपण किती जागांवर लढू शकतो किंवा आपली किती ताकद आहे हे आधीच ठरवा. तसेच, आघाडी की युती? यासंदर्भात स्थानिक पातळीवरील आपलं मत मांडा, स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा उशीर न करता लवकर निर्णय घ्या, मतदार याद्या आतापासून तपासा आणि त्यावर त्याचवेळी तक्रारी करा, मतदार यादीतील घोळांकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
हेही वाचा
याला नेपाळ, नागालँडकडे सोडा; जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार, आरक्षणावरुन जुंपली
























