विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
या घटनेची माहिती काही तासांतच आसपासच्या गावांत पसरली आणि विहिरीजवळ लोकांची गर्दी झाली.

Gadchiroli: अहेरी तालुक्यातील ताटीगुडम गावात अलीकडेच एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. गावातील एका खाजगी विहिरीतून सहा महिन्यांपासून चक्क गरम पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले. सुरुवातीला या घटनेबाबत प्रशासनालाही माहिती नव्हती. मात्र ही बातमी पसरताच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पथक गावात दाखल झाले आणि तपासणी करून या घटनेमागील खरे शास्त्रीय कारण शोधून काढले.
ग्रामस्थांचा गोंधळ आणि कुतूहल
ताटीगुडम येथील शेतकरी सत्यांना मलय्या कटकु यांच्या घराजवळील जुन्या विहिरीतून 4 सप्टेंबरपासून गरम पाणी येऊ लागले. या पाण्यात बुडबुडे दिसत होते तर वाफ निघताना देखील ग्रामस्थांनी पाहिली. एवढेच नव्हे तर हे पाणी इतके गरम होते की थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येत नव्हता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती व कुतूहल पसरले आणि परिसरातील लोकांनी विहिरीजवळ गर्दी केली. काही तज्ज्ञांनी सुरुवातीला भूगर्भातील उष्ण खडक कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त केला.
प्रशासन व तज्ज्ञांचा अंदाज
घटनेची वार्ता तालुका प्रशासनापर्यंत पोहोचली असली तरी सुरुवातीला अधिकारी या प्रकाराबाबत अनभिज्ञ होते. काही तज्ज्ञांनी मात्र यामागे भूगर्भातील उष्ण खडक कारणीभूत असू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. नैसर्गिक कारणामुळे पाणी गरम होत असल्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. यामुळे या घटनेमागील खरी कारणमीमांसा वैज्ञानिक पद्धतीने होणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
अधिकृत तपासणीत निष्कर्ष
यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पथक तातडीने ताटीगुडम येथे दाखल झाले. त्यांनी विहिरीचे प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. तपासणीत या विहिरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल 923 मि.ग्रॅ./लिटर असल्याचे स्पष्ट झाले. तसेच विहिरीतून उचललेल्या पाण्यात पांढरे कण आणि सबमर्सीबल पंपावर पांढऱ्या थराचे अस्तित्व दिसून आले.
भूशास्त्रीय अभ्यासातून येथे चुनखडक असल्याचे निष्पन्न झाले. सहा महिन्यांपूर्वी या विहिरीचा गाळ काढण्यात आला होता. त्यानंतर पाण्याचा संपर्क जमिनीखालील चुनखडकातील कॅल्शियम ऑक्साइडशी आला. पाण्याशी झालेल्या उष्माक्षेपी अभिक्रियेतून कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार झाले आणि त्यातून उष्णता निर्माण झाली. परिणामी विहिरीचे पाणी गरम झाले असल्याचा निष्कर्ष कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी नोंदवला.
ग्रामस्थांमध्ये अजूनही चर्चेचा विषय
या निष्कर्षामुळे ग्रामस्थांच्या शंका काही प्रमाणात दूर झाल्या असल्या तरी अजूनही विहिरीच्या गरम पाण्याबाबत कुतूहल कायम आहे. अनेक जण हे पाणी पाहण्यासाठी विहिरीजवळ गर्दी करत आहेत. प्रशासनाने यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले असून, वैज्ञानिक दृष्टीने हा प्रकार अभ्यासाचा महत्त्वाचा विषय ठरू शकतो, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
























