विनेश फोगाटच्या पदकावरुन वाद; रेल्वेमंत्र्यांशी पंगा घेणाऱ्या अश्नीर ग्रोवर यांना पॅरोडी अकाऊंटवरुन झापलं
पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी प्री-क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकीचा (जपान) 3-2 असा पराभव केला. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुंबई : पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत जिंकूनही पराभवाचा सामना करावा लागलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पदक न मिळाल्याने कोट्यवधि भारतीयांची निराशा झाली. विनेश फोगाटला (Vinesh Phogat) 50 किलो पेक्षा जास्त वजन असल्यानं ऑलिम्पिकमधून निलंबित करण्यात आलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Olympic) अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या विनेशचं वजन 50 किलो 100 ग्रॅम असल्याचं चाचणीत समोर आलं. विनेश फोगाटला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आल्याची बातमी येताच भारतीयांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या प्रकरणावर संसद सभागृहातही गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तत्पूर्वी विनेश फोगाटने उपांत्य फेरीत क्युबाच्या गुझमन लोपेझचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तिच्या या विजयाचं देशभरात सेलिब्रेशन सुरू झालं. विनेशने देशासाठी आणखी एक पदक निश्चित केल्याचा आनंद सोशल मीडियावरही दिसून आला. यावेळी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini vaishnav) यांनी केलेल्या ट्विटवरुन उद्योगपती आणि शार्क टँकमधील जज अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांना केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावाने असलेल्या पॅरोडी अकाऊंटवरुन सुनावलं.
पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी प्री-क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकीचा (जपान) 3-2 असा पराभव केला. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनियन कुस्तीपटू ओक्साना लिवाचचा पराभव केला. या विजयासह विनेशने उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत क्युबाच्या गुझमन लोपेझचा पराभव केला. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली होती. मात्र, विनेश अपात्र ठरल्याने कोट्यवधि भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलं. पण, विनेशच्या जिद्दी खेळीचं जगभरातून कौतुक झालं. भारतातही तिच्या विजयानंतर सेलीब्रेशन झालं, सोशल मीडियावर तिच्या आंदोलनाची आठवण सांगत तिचा लढाऊ बाणा दाखवून देण्यात आला. या दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विनेश फोगाटसाठी केलेल्या ट्विटवरुन जुंपल्याचं दिसून आलं.
कंपनी के पैसे को अपना बोल कर खा लेने वाले को देश के मेडल को अपना बोलने वालों से तकलीफ़ हो रही है। https://t.co/pTh5OdIceR
— Anurag Thakur, Union Minister Parody (@ianuragthakur1) August 7, 2024
अनुराग ठाकूर पॅरोडी अकाऊंटवरुन सुनावलं
विनेश फोगाटच्या उपांत्य फेरीतील विजयानंतर रेल्वेंमत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुन आपलं एक पदक निश्चित झाल्याचं म्हटलं होतं. त्यावर, उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांनी रिट्विट करत, आपलं नाही.. तिचं, असा टोला रेल्वेमंत्र्यांना लगावला होता. रेल्वेमंत्र्यांना लगावलेल्या या टोल्यावरुन आता केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावाने असलेल्या पॅरोडी अकाऊंटवरुन अश्नीर ग्रोवर यांना चांगलच सुनावलं आहे. कंपनीच्या पैसे स्वत:चे म्हणून खाणाऱ्यांना देशाच्या मेडलला आपलं म्हणणाऱ्यांचा त्रा होतोय, असे प्रत्युत्तर या ट्विटर अकाऊंटवरुन दिलंय. अश्नीर ग्रोवर यांनी विनेश फोगाटच्या विजयाचं क्रेडिट हे तिचं स्वत:चं किंवा तिचं पदक हे तिचं असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन, त्यांनी थेट रेल्वेमंत्र्यांशी पंगा घेतला, त्यानंतर ग्रोवर यांच्यावर अनुराग ठाकूर पॅरोडी अकाऊंने पलटवार केला आहे.
काय होता विषय
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी भारत पे कंपनीच्या सर्वच पदावरुन अश्नीर ग्रोवर यांची उचलबांगडी करण्यात आली होती. ग्रोवर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कंपनीच्या पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवत त्यांना कंपनीने पदावरुन हटवलं होतं. त्यावरुनच, अनुराग ठाकूर यांनी अश्नीर ग्रोवर यांना टोला लगावला आहे. तसेच, देशाचं पदक आपलं म्हटलं तरीही काहींना त्रास होतोय,असा टोलाही लगावला.