दहीहंडीला दोन बियर फ्री, वादग्रस्त जाहिरातीनंतर हिंदू आक्रमक; रिसॉर्टमालकाने जोडले हात
गोव्यातील पेडणे मोरजी येथील प्रसिद्ध फोक्सोसोला बीच रिसॉर्टने जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बियर फ्री देण्याच जाहिरात केली.
सिंधुदुर्ग : सण, उत्सव म्हटलं की लोकांमध्ये उत्साह असतो, वेगळाच आनंद आणि उत्सवाची तयारीदेखील सुरु असते. या उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वचजण आपलं योगदान देत असतात. या काळात मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळते, बाजारात खरेदीसाठी रेलचेल असते तर दुकानदार किंवा विक्रेत्यांकडून विविध ऑफर देण्यात येतात. नुकतेच रक्षाबंधन सणाचा उत्साह देशभर पाहायला मिळाला. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे यंदाचा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आणि बहिणींना आनंद देणारा ठरला. आता, दहीहंडी उत्सव जवळ येत असून गोविंदा पथकांकडून या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, याच दहीहंडी उत्सावासाठी एका रिसॉर्टने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरुन हिंदू संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
गोव्यातील पेडणे मोरजी येथील प्रसिद्ध फोक्सोसोला बीच रिसॉर्टने जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बियर फ्री देण्याच जाहिरात केली. या प्रकरणाची हिंदू जनजागृती समितीने दखल घेत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्यावर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवली आहे. तसेच नियोजित कार्यक्रम देखील रद्द केला आहे. मात्र, या जाहिरातीची चांगलीच चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत होती.
मांद्रेतील फोक्सोसोला बीच रिसॉर्टमध्ये जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दही हंडीकार्यक्रमाच्या जाहिरातची पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते. या विषयी माहिती मिळाल्यानंतर हिंदू जनजागृती समिती आणि हिंदूत्वनिष्ठ यांच्या शिष्टमंडळाने मांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस यांची भेट घेऊन रिसॉर्टचे विज्ञापन आणि कार्यक्रमाचे आयोजन यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शरीफ जाकीस यांनी रिसॉर्टच्या संचालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी रिसॉर्टच्या संचालकांनी सर्वांची क्षमा मागितली आणि कार्यक्रम देखील रद्द केला.