Video : राहुल गांधी अन् मनोज जरांगेंची भेट होणार का?; पत्रकाराच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
Rahul gandhi meet manoj Jarange मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली असून विधानसभेत उमेदवारच उभा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे
जालना : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यावरुन तर्क वितर्क सुरू आहेत. मात्र, आमची भेट ही केवळ सदिच्छा भेट असून मी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. तसेच, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आमच्याकडून कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट करत मराठा आरक्षणास आमचा पाठिंबा असून राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असेही चव्हाण यांनी म्हटले. पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही चव्हाण यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या बैठकीसाठी आम्हाला दोनवेळेला मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावलं, त्यावेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोले हेही बैठकीला आमच्यासोबत होते. त्यावेळी, आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मात्र,केवळ बैठकांचंच रहाटगाडगं करत असाल तर, आम्ही आमची भूमिका मांडली. आता, सरकार म्हणून तुम्ही तुमचं काम करा, आमचा पाठिंबा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली असून विधानसभेत उमेदवारच उभा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे 29 ऑगस्ट रोजी ते यासंदर्भातील निर्णयही जाहीर करणार होते, मात्र विधानसभा निवडणुका लढवण्यासंदर्भातील घोषणेची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे, जरांगे खरंच निवडणूक लढवणार आहेत की, गत निवडणुकांप्रमाणे कोणाला तरी पाडा म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच, आज पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरावाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे. तुम्ही वाशीमध्ये जे आश्वासन त्यांना दिलं, त्याचं समाधान झालं, तुम्ही गुलाल उधळला. पण, तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, म्हणूनच मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. आज मी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच आलो होते, राजकारणावर बिलकुल चर्चा झाली नाही. त्यांनी त्यांची काही मतं व्यक्त केली, पण आमच्यादृष्टीने ही सदिच्छा भेट होती, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) जरांगे भेटीवर काय म्हणाले चव्हाण
राहुल गांधी अन् जरांगे पाटील यांची भेट होणार, अशी काही चर्चा झाली का, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी हात जोडून उत्तर देणं टाळलं. तसेच, आमच्या ताई कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षा आहेत, त्याच याबाबत माहिती देतील, असे चव्हाण यांनी म्हटले. त्यावर, रजनी पाटील यांनी पुढे येत, तशी काहीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं.
हेही वाचा
मोठी राजकीय उलथापालथ, पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी चर्चा, नेमकं काय घडलं?