Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या 'या' रुग्णांना मिळते तिकीटात सूट, यादी पाहिली का?
Indian Railway Ticket Concession for Patients : रेल्वेने प्रवास करणाऱ्या काही रुग्णांना तिकीट दरात सवलत मिळते. या यादीतील आजार कोणते आणि त्यांना भाड्यात किती सवलत मिळते ते जाणून घ्या.
मुंबई : रेल्वे हा प्रवासाचा सोपा आणि खिशाला परवडणारा मार्ग आहे. भारतात रेल्वेचं मोठं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वे प्रत्येक वर्गानुसार प्रवासात सुविधा पुरवते. जनरल डब्यापासून ते फर्स्ट एसी ते डब्यापर्यंत प्रत्येक प्रवासी आपल्याला परवडणाऱ्या डब्याने प्रवास करतात. दरम्यान, काही विशेष गरजूंनाही रेल्वे भाड्यात सूट देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सूट असते हे, तुम्हाला माहितचं असेल. पण, फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर काही रुग्णांनाही रेल्वे भाड्यात सूट दिली जाते. रेल्वेच्या नियमांनुसार काही आजारांच्या रुग्णांसाठी रेल्वे भाड्यात सूट देण्याची तरतूद आहे.
रेल्वेने नमूद केलेल्या आजारांचा रुग्ण असेल तर त्यांना भाड्यात सूट मिळेल आणि त्यासोबतच त्यांच्या एका व्यक्तीलाही हा लाभ मिळेल. रेल्वे भाड्यातील सूट असणाऱ्या यादीतील आजार कोणते आणि त्यांना भाड्यात किती सवलत मिळू शकते ते जाणून घ्या.
- कर्करोगाचे (Cancer Patient) रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला रेल्वे भाड्यात सूट मिळते. कॅन्सरच्या रुग्णाला फर्स्ट एसी क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लासमध्ये 75 टक्के सूट मिळते. याशिवाय स्लीपर आणि एसी-3 टियरमध्ये 100 टक्के सूट मिळते. फर्स्ट एसी आणि एसी-2 टियरमध्ये 50 टक्के सूट उपलब्ध आहे. बस अटेंडंटना स्लीपर आणि AC-3 सीटवर 75 टक्के सूट मिळते.
- क्षयरोगाचे (TB) रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्ती स्लीपर, फर्स्ट क्लास, सेकंड क्लासमध्ये 75 टक्के सवलत मिळते. त्याच्यासोबतच्या आणखी एका व्यक्तीलाही तेवढीच सूट मिळते.
- एड्स रुग्णांना (HIV Aids) उपचारासाठी किंवा तपासणीसाठी जाणाऱ्या द्वितीय श्रेणीमध्ये 50 टक्के सवलत दिली जाते.
- संसर्ग नसलेल्या कुष्ठरुग्णांना रेल्वे भाड्यातही सूट मिळते. या रुग्णांना स्लीपर, फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमध्ये 75 टक्के सवलत दिली जाते.
- थॅलेसेमियाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांना फर्स्ट, सेकंड क्लास, स्लीपर, एसी-3 टायर, एसी चेअर कार, फर्स्ट आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सवलत मिळते.
- हृदय शस्त्रक्रियेसाठी जाणारे रुग्ण आणि अटेंडंट यांना फर्स्ट, सेकंड क्लास, स्लीपर, एसी-3 टायर, एसी चेअर कार, फर्स्ट आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सूट मिळते.
- ऑपरेशन किंवा डायलिसिससाठी जाणारे मूत्रपिंड रुग्ण यांनाही सूट मिळते. या रुग्णांना फर्स्ट, सेकंड क्लास, स्लीपर, एसी-3 टायर, एसी चेअर कार, फर्स्ट आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सवलत मिळते. परिचरांनाही या सुविधा मिळतात.
- ॲनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, एसी-3 टायर आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सूट मिळते.
- उपचारासाठी किंवा तपासणीसाठी जाणारे हिमोफिलियाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले परिचर यांना भाड्यातून सूट देण्यात आली आहे. या लोकांना सेकंड, स्लीपर, फर्स्ट क्लास, एसी-3 टायर, एसी चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते.
संबंधित इतर बातम्या