(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahapur Water Leakage: शहापुरात भातसा धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड, लाखो लिटर पाणी वाया, शेतकरी मात्र चिंतेत
Shahapur : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. कालव्याचे पाणी बंद केल्याने उन्हाच्या तडाख्याने पिकं करपणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
Shahapur Bhatsa Dam Leakage: शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या (Bhatsa Dam) उजव्या कालव्याला वाशिंदजवळ (Washind) भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे. पाण्यामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले नसले तरी भगदाड पडल्याने कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. पाण्याअभावी उन्हाच्या तडाख्याने पिके करपून नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. कालव्याला भगदाड पडण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा कालवा आता हानिकारक ठरू लागला आहे. कालवा फुटल्याची ही पहिली वेळ नाही, तर या आधी देखील अनेकवेळा कालवा फुटल्याची घटना घडली आहे.
भातसा धरणापासून 31 किमी अंतरावर वाशिंद गावाजवळ मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास उजव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. भगदाड पडलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांची पिके नसल्याने तेथील पिकांची नासाडी झाली नाही, मात्र कालव्याचे पाणी आता बंद केले गेले आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच काही दिवस उजव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा पाणी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. पाण्याविना पिके सुकून जातील अशी चिंता बळीराजाला वाटू लागली आहे, त्यामुळे कालव्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी गावकरी करु लागले आहेत.
दरम्यान कालवा फुटल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अद्याप कोणत्याही प्रकारचा पंचनामा करण्यात आला नाही. कालव्याच्या दुरुस्ती कामालाही अद्याप सुरुवात झालेली नाही, त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. लवकरात लवकर कालवा दुरुस्तीचे काम हाती घेऊन कामाला सुरुवात करावी, तसेच कालव्याची योग्य ती काळजी घेतली जावी, नियमित साफसफाई केली जावी, अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीच्या घटना शहापुरातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
शहापुरातील 40 वर्षे जुना झालेल्या भातसा धरणाच्या उजव्या कालव्याला उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी पोखरून ठेवले आहे. त्यामुळे नेहमीच पाण्याची प्रचंड प्रमाणात गळती होत असून कालव्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपसून कालव्याची साफसफाई आणि दुरुस्तीची कामेही वेळोवेळी होत नसल्याने कालव्यात मोठमोठी झाडे-झुडपे आली आहेत. कालव्याला विविध ठिकाणी भगदाड पडून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. कालव्याच्या आजूबाजूचा परिसरही त्यामुळे बाधित होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: