ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मार्ग रखडला, प्रवासी अजूनही सोयी सुविधांच्या प्रतीक्षेत
स्थानकाच्या आवारात विविध सोयी सुविधा उभारण्यासाठी 983 कोटींचा निधी मंजूर झाला असूनही अजून कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे या स्थानकात येणारे प्रवासी अजूनही सोयी सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत.
ठाणे : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या (Thane Railway Station) पुनर्विकासाचा मार्ग अजूनही रखडलेला आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या पुनर्विकास यादीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचे नाव होते, मात्र अजूनही या रेल्वे स्थानकाच्या कामास सुरुवात झालेली नाही. निविदा प्रक्रिया देखील राबवली गेली नाही. या स्थानकातून रोज सात लाखाहून जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थानकात मल्टी लेवल पार्किंग, तीन कमर्शियल टॉवर, फलाट आणि स्थानकाच्या आवारात विविध सोयी सुविधा उभारण्यासाठी 983 कोटींचा निधी मंजूर झाला असूनही अजून कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे या स्थानकात येणारे प्रवासी अजूनही सोयी सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत.
16 एप्रिल 1853 साली आशिया खंडात पहिली रेल्वे वाडी बंदर ते ठाणे या स्थानकांच्या दरम्यान धावली. त्यामुळेच मागच्या 170 वर्षांपासून ठाणे स्थानक प्रवाशांना एकाच तालुक्यातून दुसऱ्या स्थानकात जाण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे. मात्र आता या स्थानकाची क्षमता संपली असल्याने अधिकच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी सीएसएमटी, दादर कल्याण ठाकुर्ली यांच्यासोबत ठाणे स्थानकाचा देखील पुनर्विकास करण्याची योजना रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीद्वारे आखण्यात आली. त्यातून ठाणे स्थानकासाठी 983 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र अजूनही या कामाची निविदा प्रक्रियाच राबवली गेली नाही. त्यामुळे 2024 मध्ये हे काम कसे सुरु होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल साठी 2500 कोटी मंजूर असून त्याचे कामही सुरू झालेले आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रवासी संख्येमुळे ठाणे स्थानकावरील ताण वाढत आहे. इथे असलेले फलाट, पादचारी पूल, वाहनांची पार्किंग व्यवस्था, शौचालय, प्रतीक्षालय या आणि इतर अनेक सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
लवकरात लवकर पुनर्विकासाला सुरुवात करा, खासदार राजन विचारे यांची मागणी
ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी संसदेत मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पाच्या कामास चालना देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करीत असताना ठाणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक ओळखले जावे यासाठी, प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी 2024 पर्यंत काम सुरू करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी केली आहे. दुसरीकडे प्रवाशांना ठाणे स्थानकात होत असलेल्या गैरसोयीबद्दल प्रवासी संघटनेने देखील चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रालयाने त्वरित लवकरात लवकर पुनर्विकासाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कसा होईल पुनर्विकास?
पहिल्या टप्प्यात
प्लॅटफॉर्म लेव्हल- प्रवाशांना अपूर्ण पडणारी फलाट तोडून एकूण 25 हजार 500 स्क्वेअर मीटरमध्ये त्याची बांधणी केली जाणार आहे.
रूफ प्लाझा लेव्हल - 52 हजार 500 स्क्वेअर मीटर जागेवर विकास होणार आहे. यात प्रवाशांना लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा असणार आहेत. यात प्रतीक्षा कक्ष, शौचालय, एक्झिक्युटिव्ह लाँच, केटरिंगसाठी स्टॉल असणार आहे.
दुसरा मजला- 13 हजार 500 स्क्वेअर मीटरमध्ये असणार असून त्यामध्ये शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट व इतर सुविधा यांचा समावेश असणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात
पश्चिमेस असणाऱ्या ठाणे रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे वसाहतींच्या जागेवर व इतर कार्यालयांच्या जागेवर पीपीपीच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीन कमर्शियल टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्याबदल्यात रेल्वे वसाहतीतील 164 घरे, मल्टी लेव्हल पार्किंग असणार आहे. यात दुचाकी 1800, चार चाकी 1500 पार्क करण्याची क्षमता असणार आहे. याची कनेक्टिव्हिटी मेट्रोला ही देण्यात येणार आहे.
एकीकडे कळवा ऐरोली एलेवतेड रेल्वे प्रोजेक्ट रखडला आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच ठाणे शहराचा देखील विकास हा प्रचंड वेगाने होत आहे. मुलुंड आणि ठाणे दरम्यानच्या नवीन स्थानकाचे काम देखील अद्याप सुरू झालेले नाही. या सर्व कारणामुळे ठाणे स्थानक विस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. म्हणूनच या स्थानकाचा लवकरात लवकर पुनर्विकास होणे आवश्यक आहे.
हे ही वाचा :