ATS Action : बनावट शिधापत्रिका बनावणाऱ्या तिघांना अटक, ठाणे जिल्ह्यात एटीएसची कारवाई
ATS Action : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातून तिघांना बनावट शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरुन अटक केली आहे.
ठाणे : बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील नागरिकांना शिधापत्रिका (Ration Card) बनवून दिल्याच्या संशयावरुन एटीएसने (ATS) कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातून तिघांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे. ठाणे परिसरात बनावट शिधापत्रिका बनवणारे काही लोक असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या ठाणे युनिटने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं. इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?
या तिघांना अटक केलेल्यांपैकी नौशाद राय अहमद शेख हा रेशनचं दुकान चालवत असे. तर इतर दोघांवर बनावट कागदपत्रे बनवून देण्याची जबाबदारी होती. इरफान अली अन्सारी आणि संजय बोध हे दोघेजण बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांना बनावट शिधापत्रिका तयार करुन देत असे. एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी बांग्लादेशातील नागरिकांना भारतीय कागदपत्रे मिळवून देण्यासाठी लोकांकडून पैसे घेत असत. त्यानंतर त्यांना बनावट शिधापत्रिका बनवून देत, जेणेकरुन त्यांची खरी ओळख कोणालाही होऊ नये. ही शिधापत्रिका आठ हजार रुपयांमध्ये बनवून देत असल्याची माहिती देखील यावेळी एटीएसला देण्यात आली आहे.
बांगलादेश टू भिवंडी, व्हाया पश्चिम बंगाल...
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी नागरिकांकडे भारतात येण्यासाठी आवश्यक पारपत्र आणि परवाना तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र या सर्व शासकीय नियमांना बगल देऊन केवळ दलालाच्या मध्यस्थीने छुप्या आणि अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात येतात.आणि याच दलालांच्या मदतीने पुढे भारतातील विविध कानाकोपऱ्यात वास्तव्य करतात.कामाच्या शोधात आलेले हे बांगलादेशी नागरिक बहुतेक करून राज्यातील मुस्लिम बहुल भागांमध्ये राहतात.
दलाल घेतात 7 ते 8 हजार रुपये
भिवंडीत अवैध राहत असलेले बांगलादेशी नागरिक दलालाला 7 ते 8 हजार रुपये देऊन भारतात येतात. हेच दलाल त्यांच्यासाठी भारतातील पॅन कार्ड,आधार कार्ड आणि इतर बोगस कागदपत्र तयार करून देतात. तर बारमध्ये काम करणाऱ्या बांगलादेशी तारुणींकडून 10 ते 15 हजार हे दलाल घेत असतात. भिवंडी या संवेदनशील आणि कामगार नगरीत देखील अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. अवजड काम तसेच बांधकाम क्षेत्रात मजुरी,डाइंग सायजिंगमध्ये बॉयलर अटेंडंट आणि प्लंबिंगचे काम करून भिवंडीतील अनेक ठिकाणी चाळींमध्ये हे नागरिक आपली ओळख लपवून राहतात.
पश्चिम बंगालच्या सीमेवरून भारतात येतात
बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. तर भारतातील पश्चिम बंगालच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये बोलली जाणारी बोली भाषा हि बांगलादेशी नगरिकांसारखीच आहे. अनेक बांगलादेशी नागरिकांचे नातेवाईक देखील या सीमेलगतच्या गावांमध्ये सारखीच असल्याने या गावांमधूनच हे नागरिक भारतात येत असतात.
देश विघातक कृत्यात सहभाग नाही,मात्र कारवाई होणारच
अटक केलेले हे बांगलादेशी नागरिक देशविघातक कृत्याशी संबंधित नसतात केवळ रोजगाराच्या शोधातच ते शहरात आल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. तरीही बेकायदेशीर शहरात रहाणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने यापुढेही शहरात अवैध राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया एटीएसच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.