Jitendra Awhad : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूरमध्ये पाण्याची भीषण टंचाई, सत्तेच्या धुंदीत आणि कलेक्शनच्या नादात शासनाला वेळच नाही: जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad On Shahapur Water Crisis : शहापूर शहरात बस स्टॅन्डची अवस्था अतिशय बिकट असून कधीही दुर्घटना घडेल अशी परिस्थिती असल्याची तक्रार नागरिकांनी केली.
ठाणे : संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, पण सत्तेच्या धुंदीत आणि कलेक्शनच्या नादात शासनाला याकडे पाहायला वेळच नसल्याची टीका राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. ते शहापूरमधील पाणी टंचाईच्या भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते.
राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा दौरा केला. यावेळी शहापूर तालुक्यातील माळ, भिवळवाडी गावांना भेट देऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या नागरिकांनी त्यांची व्यथा जितेंद्र आव्हाड यांना सांगितली.
शहापूर शहरात बस स्टॅन्डची अवस्था अतिशय बिकट असून कधीही दुर्घटना घडेल अशी परिस्थिती झाली असताना बस स्थानकाचे काम रखडल्याची तक्रारही नागरिकांनी केली. बस स्थानकाची पाहणी करुन प्रवाशांशी विचारपूस आणि चौकशी आव्हाडांनी केली. दरम्यान शहापूर तालुक्यातील खर्डी येथे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही फक्त उद्घाटनासाठी वाट पाहिली जात असल्याचे भीषण चित्र आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
या सरकारने मोठ्या प्रमाणात आमदारांना निधी दिला असताना शहापूर तालुक्यात पाण्याची टंचाई भासत आहे. यंदा पावसाचा प्रमाण कमी झाला आहे त्यामुळे वेळे आधीच विहिरी आटल्या आहेत. शहापूर तालुक्यातील अनेक भागात पाण्याची भीषण टंचाई आहे. मात्र शासनाला या सर्वांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या बस स्थानकात कधीही दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती असताना त्याचे बांधकाम रखडले आहे. तर दुसरीकडे खर्डी गावात उपजिल्हा रुग्णालय बांधून पूर्ण झाले असताना मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी हे रुग्णालय वाट पाहत आहेत. मंत्री महोदयांकडे उद्घाटनासाठी वेळ नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. सत्तेच्या धुंदीत आणि कलेक्शनच्या नादात शासनाला तहानलेल्या जनतेकडे पाण्यासाठी वेळच नाही.
ही बातमी वाचा: