Bhima Koregaon : पुणे पोलीस आयुक्तांसह 42 ACP, 84 इन्स्पेक्टर आणि 3200 पोलीस कर्मचारी; शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Bhima Koregaon Case : विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी लाखोंच्या संख्येत अनुयायी हजेरी लावतात. त्यामुळे पोलिसांनी त्याचे चोख नियोजन केलं आहे.
पुणे: जिल्ह्यातील कोरेगाव भीमा (Bhima Koregaon) या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येतात, त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चोख नियोजन केलं आहे. कोरेगाव भीमा ठिकाणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी 3200 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त यांच्यासह 11 पोलीस उपायुक्त देखील कोरेगाव भीमा परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. यासह 42 सहाय्यक पोलीस आयुक्त, 84 वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणच्या बंदोबस्तासाठी असणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी 3200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 700 होम गार्डस आणि SRPF च्या 6 तुकड्या असणार आहेत.
दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनुयायी जमतात. त्यामुळे शुक्रवारपासून या परिसरात कुठलीही राजकीय किंवा धार्मिक सभा घेता येणार नाही. तसेच सोशल मीडियावर देखील पुणे पोलिसांचं लक्ष असणार आहे.
लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ (Bhima Koregaon Battle)
कोरेगाव भीमा या ठिकाणी 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार पलटनीच्या जोरावर इंग्रजांनी पेशव्यांच्या विरोधात युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो. या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकर अनुयायी येतात, तसेच इतरही लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी येतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती विजय स्तंभास भेट
या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आज येणार आहेत. पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. 205 वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा इथं झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
काय आहे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण?
1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली. त्यावेळी घडलेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अनेक वाहनांची जाळपोळ झाली, मालमत्तेचं नुकसान झालं. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. अफवांमुळे औरंगाबाद, माजलगाव, परभणी, सोलापूर शहरांमध्येही तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप करण्यात आला होता.
ही बातमी वाचा: