Voting Bycott : पूर्ण टोल माफी द्या अन्यथा दहा हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार, मुंबईच्या वेशीवरील हरी ओम नगरचा इशारा
Hari Om Nagar Demands Toll Waiver : मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या हरी ओम नगरच्या रहिवाशांना मुंबईत जाण्यासाठी टोल द्यावा लागत आहे. तो टोल पूर्णपणे माफ करावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
ठाणे : लोकसभेच्या निवडणुका सुरू असून अनेक ठिकाणी काही गावांनी वा समूदायाने मतदानावर बहिष्कार टाकल्याचं आपण ऐकतोय, त्यासाठी वेगवेगळी कारणंही असतात. पण ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी मात्र वेगळ्याच कारणामुळे मतदान करणार नसल्याचं जाहीर केलंय. तब्बल दहा हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरातील रहिवाशांना टोल माफी मिळावी अशी मागणी करत हरी ओम नगरने मतदानावर बहिष्कार (Hari Om Nagar Warns To Boycott Voting) टाकण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई-ठाण्याच्या वेशीवर असल्याने टोलचा त्रास
हरी ओम नगर ही ठाणे शहराच्या कोपरी गावाला चिकटून वसलेली वस्ती आहे. मात्र इथे राहणारे रहिवाशी मुंबई शहरात मोडतात. त्यांचा कर भरणा देखील मुंबई महापालिकेत आहे. त्यामुळे पत्ता मुंबई असा असल्याने हरी ओम नगरपासून जवळच असलेल्या मुंबई एन्ट्री पॉइंट टोल नाक्यावर या रहिवाशांकडू टोल वसूल केला जातो.
आपल्याला टोल मुक्ती द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी करत आहेत. त्यासाठी अनेक आंदोलने, अनेक भेटी गाठी करूनदेखील ही मागणी पूर्ण झालेली नाही. हरी ओम नगर येथे 50 पेक्षा जास्त इमारती आहेत तर 26 गृहनिर्माण सोसायटी आहेत. इथे दहा हजारपेक्षा जास्त मुंबईकर राहतात. त्यांनी आता मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
काही वर्षांपूर्वी टोलमध्ये सूट
काही वर्षांपूर्वी या रहिवाशांच्या आंदोलनाने टोलच्या मासिक पासमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र आता पूर्ण टोल माफी द्यावी अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे. तसेच कोपरी येथे पूर्व द्रुतगती महामार्गावर हरी ओम नगरमध्ये जाण्यासाठी अंडर पास आणि सिग्नल यंत्रणा देण्याची मागणी देखील रहिवाशांनी केली आहे.
'एबीपी माझा'च्या बातमीनंतर या ठिकाणी सिग्नल यंत्रणा तर उभारण्यात आली आहे. मात्र ती अजून बंद आहे. महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेजा यांनी हरी ओम नगरमधील रहिवाशांच्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेऊन कागदोपत्री प्रश्न निकाली काढला खरा, मात्र त्याची अंमलबजावणी अजून झाली नसल्याने रहिवाशी नाराज आहेत.
कल्याण पूर्वेतील नागरिकांचा मतदान बहिष्काराचा इशारा
कल्याण पूर्वेत वालधूनी नदी पात्रात भराव टाकल्याने पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीपात्रातील बांधकाम थांबवा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल आणि यापुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
ही बातमी वाचा: