Maratha Reservation : कल्याण जिल्हाप्रमुखाचे घुमजाव; मराठा आरक्षणासाठी CM शिंदेंवर विश्वास, मात्र निर्णय न झाल्यास...
Maratha Reservation : पोलीस मराठ्यांना नोटीस देत असतील तर मराठा मुख्यमंत्री नको असं विधान करणारे शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने काही तासांत घुमजाव केले.
कल्याण : मराठा मुख्यमंत्री असताना जर पोलीस मराठ्यांना नोटीस देत असतील तर मराठा मुख्यमंत्री नको असं विधान करणारे शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) जिल्हाप्रमुखाने काही तासांत घुमजाव करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असे स्पष्टीकरण दिलंय. यावेळी बोलताना अरविंद मोरे (Arvind More) यांनी आज पर्यंत जितके मराठा मुख्यमंत्री मिळाले त्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे वेगळे असल्याचे म्हटले आहे. दसरा मेळाव्यात (Dasara Melava) त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण मिळवून देईल असे आश्वासन दिले. मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच (CM Ekanth Shinde) देऊ शकतात असा आमचा सर्वांचा विश्वास असल्याचे मोरे यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठाच असला पाहिजे आणि ते एकनाथ शिंदेच असले पाहिजेत असा माझ्या वक्तव्याचा अर्थ होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आरक्षण द्यावं अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबई ठाणे येथील मराठा क्रांती मोर्चा मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते मराठा आरक्षण देतील. मात्र त्यानंतर ही जर मराठा आरक्षण मिळत नसेल तर मी कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे अरविंद मोरे यांनी म्हटले.
अरविंद मोरे यांनी काय म्हटले होते?
तात्काळ आणि टिकणारं मराठा आरक्षण दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे तर ते पूर्ण करतीलच. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार आहे अशी घोषणा अरविंद मोरे यांनी केली. शांततेत उपोषण सुरू आहे साखळी उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारत नोटीस दिली आहे. मराठा मुख्यमंत्री असताना जर पोलीस मराठ्यांना नोटीस देत असतील तर मराठा मुख्यमंत्री नको अशी आक्रमक भूमिका अरविंद मोरे यांनी मांडली यावेळी मांडली. अरविंद मोरे यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा राज्यातील मराठा समाजाची आहे.
अजित पवार यांना बारामतीमध्ये येण्यास बंदी, आल्यास आंदोलन करु; मराठा मोर्चाचा इशारा
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतच येण्यास बंदी करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, आलात तर आंदोलन करु, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला येवू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासन पोलीस प्रशासन आणि सकल मराठा समाजाची संयुक्त बैठक कारखान्याच्या शिवतीर्थ कार्यालयात झाली. ती बैठक निष्फळ ठरली.