Kalyan Maratha Reservation कल्याणच्या जिल्हाप्रमुखानेच एकनाथ शिंदेंविरुद्ध शड्डू ठोकला, म्हणाला, असे मुख्यमंत्री नकोत!
Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटातही पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील पदाधिकाऱ्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
कल्याण, ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र समोर आले आहे अनेक गावांमध्ये राजकीय पुढार्यांना गावांमध्ये प्रवेश बंदी केली असून गावोगावी शहरांमध्ये मराठा समाज एकवटला आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषण तर लाक्षणिक उपोषण मराठा समाजाकडून सुरू आहे. या मोर्चामध्ये राज्य शासनाला मराठा समाज जबाबदार धरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटातही पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील पदाधिकाऱ्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण आंदोलकांना पोलिसांकडून देण्यात येत असलेल्या नोटिसांवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठिंबा दिला जात आहे. कल्याणमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज कल्याण तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
असे मुख्यमंत्री नकोच...
तात्काळ आणि टिकणारं मराठा आरक्षण दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे तर ते पूर्ण करतीलच. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार आहे अशी घोषणा अरविंद मोरे यांनी केली. शांततेत उपोषण सुरू आहे साखळी उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारत नोटीस दिली आहे. मराठा मुख्यमंत्री असताना जर पोलीस मराठ्यांना नोटीस देत असतील तर मराठा मुख्यमंत्री नको अशी आक्रमक भूमिका अरविंद मोरे यांनी मांडली यावेळी मांडली. अरविंद मोरे यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा राज्यातील मराठा समाजाची आहे.
अजित पवार यांना बारामतीमध्ये येण्यास बंदी, आल्यास आंदोलन करु; मराठा मोर्चाचा इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतच येण्यास बंदी करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, आलात तर आंदोलन करु, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला येवू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासन पोलीस प्रशासन आणि सकल मराठा समाजाची संयुक्त बैठक कारखान्याच्या शिवतीर्थ कार्यालयात झाली. ती बैठक निष्फळ ठरली.