(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण-डोंबिवलीकरांना मिळणार शुद्ध पाणी; केडीएमसी उभारणार स्वतःचीच जलतपासणी प्रयोगशाळा
Kalyan-Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिका स्वतःचीच सुसज्ज अशी जलतपासणी प्रयोगशाळा उभारणार आहे.
Kalyan-Dombivli Municipal Corporation News : दूषित पाण्यामुळे (Contaminated Water) आपल्याला दरवर्षी विविध आजारांना सामोरं जावं लागतं. कावीळ (Jaundice), मलेरिया (Malaria), टायफॉइड (Typhoid), गॅस्ट्रो (Stomach flu) यांसारखे आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. या पार्श्वभमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं (Kalyan-Dombivli Municipal Corporation) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी केडीएमसी (KDMC) प्रशासनानं आता स्वतःचीच सुसज्ज अशी जल तपासणी प्रयोगशाळा (Water Testing Laboratory) उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.
कल्याण (Kalyan) डोंबिवली (Dombivli) या दोन्ही शहरांची संख्या सुमारे पंधरा लाखांहून अधिक झाली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणं आणि त्यातही नागरिकांना होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता कायम राखणं हे केडीएमसी प्रशासनासमोरील मोठं आव्हान आहे. नागरिकांना पुरवलं जाणारं पाणी हे कितपत शुद्ध आहे, त्यामध्ये काही विषाणूंचा प्रादुर्भाव तर नाही ना आदी गोष्टी तपासण्यासाठी दर दिवसाआड पाण्याचे नमुने गोळा करून कोकण भवन (Konkan Bhawan) येथील शासनमान्य प्रयोगशाळेत पाठवले जातात. मात्र त्याचे अहवाल येण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत असल्यानं पाण्याच्या गुणवत्तेची माहिती मिळण्यासाठी केडीएमसी प्रशासनाला वाट पाहावी लागते.
विशेषतः पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्यानं केडीएमसी प्रशासनाला पाणी पुरवठ्याबाबत अधिक सतर्क राहावं लागतं. मात्र पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल प्राप्त होण्यास लागणारा विलंब पाहता केडीएमसी प्रशासनानं आता स्वतःचीच सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भातील माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली आहे. तसेच प्रत्येक प्रभागांतील किमान 10 ठिकाणचे जलनमुने घेण्यात यावेत आणि पाणी नमुने टॅप वॉटरचे (नळाचे) असले पाहिजेत याची दक्षता घ्यावी, आरोग्य विभागानं देखील घेतल्या जाणार्या नमुन्याबाबत अशी कारवाई करावी, असे निर्देश शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिले आहेत.
दरम्यान, केडीएमसीकडून आतापर्यंत केला जाणारा पाणीपुरवठा हा शुद्धच असतो. मात्र त्याच्या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासण्या, दूषित पाण्याद्वारे आजार पसरवणाऱ्या विषाणूंची माहिती, तसेच पाण्यातील क्लोरीनसह इतर घटकांचे प्रमाण योग्य आहे की नाही, याबाबत वेळेत माहिती मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे केडीएमसीकडून ही सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.