हेडफोन घालून रुळ ओलांडताना महिलेचा मृत्यू, वाचवायला गेलेला युवकही ठार; आई-वडिलांचा आधार गेला
रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला, तर या महिलेला वाचवायला गेलेल्या तिच्या सहकारी तरुणानेही यात जीव गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठाणे : रस्त्यावर चालताना किंवा रेल्वे रुळ (Railway) ओलांडताना सावधगिरी बाळगली पाहिजे, आजुबाजूला पाहिलं पाहिजे असं सातत्याने सांगितलं जातं. रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखील नागरिकांना, प्रवाशांना आवाहन केलं जातं. मात्र, अनेकदा काही प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे अपघात (Accident) घडतात, त्यात प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. अंबरनाथच्या (ambarnath) मोरीवली गावात अशीच अपघाताची भीषण घटना घडली. कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला, तर या महिलेला वाचवायला गेलेल्या तिच्या सहकारी तरुणानेही यात जीव गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळची घटना राहणाऱ्या 45 वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा 29 वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवार 20 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला. तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली, यावेळी आतिष आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला, पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिष हा वैशाली यांना वाचवायला धावला, अन् दुर्दैवाने या दोघांनाही रेल्वेनं उडवलं. या भीषण अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आतिषच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्नं झालेली असून तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता. त्याच्या अशा अकाली मृत्यूनं आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर, दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि 22 वर्षांचा मुलगा असून त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होते. मात्र, काळाच्या मनात वेगळंच होतं, रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानं धोत्रे कुटुंबाचाही आधार हरपला आहे.
पादचारी पूल उभारण्याची मागणी
दरम्यान, या घटनेनंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे. मोरीवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
हेही वाचा
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोकणात; निसर्गरम्य धबधब्याजवळ लोकार्पण























