Pahalgam Terror Attack : फिरायला गेलेल्या डोंबिवलीतील मोने कुटुंबावर आभाळ कोसळलं, दहशतवाद्यांच्या गोळीबारात अतुल मोनेंचा मृत्यू
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये राज्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एकूण 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले आणि डोंबिवलीच अतुल मोने अशी मृत पर्यटकांची नावं आहेत. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेच्या ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहतात. अतुल मोने हे पत्नी आणि मुलीसह पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अतुल मोने हे रेलेच्या परळ येथील वर्क शॉप विभागात सेक्शन इंजिनीअर पदावर कार्यरत होते. तर पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हे दोन पर्यटक जखमी झाले आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती काश्मीर प्रशासनाने दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.
अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवली भाग शाळा मैदान परिसरात राहणारे हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले हेदेखील त्यांच्या कुटुंबास पहलगामला गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे.
पुण्यातील पर्यटकांवर गोळीबार
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. यामध्ये पुण्यातील काही पर्यटकदेखील असल्याची माहिती समोर आली आहे. जगदाळे पती-पत्नी आणि गणबोटे दाम्पत्य, घोड्यावर बसलेले असताना नाव विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत सांगितलं की, पुण्यातील दोन कुटुंबीय पहलगामला गेले होते. हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या कुटुंबांशी माझा संपर्क झाला आहे. या कुटुंबातील सगळ्या महिला सुरक्षित आहेत. लवकरच त्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे.
पुण्याहून पहलगामला गेलेले पर्यटक
- असावरी जगदाळे - महाराष्ट्र
- प्रगती जगदाळे - महाराष्ट्र
- संतोष जगदाळे - महाराष्ट्
- कौस्तुभ गणबोटे - महाराष्ट्र
- संगीता गणबोटे - पुणे
भारताचं नंदनवन रक्ताने माखलं
पृथ्वीवरचा स्वर्ग, नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं काश्मीर, मंगळवारी दहशतवाद्यांच्या गोळीबाराने थरारलं आणि पांढरशुभ्र भूमी पर्यटकांच्या रक्ताने लाल झाली. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी, पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार केली. दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्या चालवल्या, ज्यामध्ये 28 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येने पर्यटक जम्मू काश्मीरला जात असतात. बऱ्याच काळानंतर काश्मीरमध्ये प्रथमच पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची नाकाबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत.























