Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC स्फोट बॉयलरचा नव्हे, तर कशाचा? अग्निशमन दलाची माहिती, बफर झोनबाबत धक्कादायक माहिती
Dombivli News: डोंबिवली एमआयडीसी स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवेत धोकादायक रसायने. अग्निशमन दलाची नवी माहिती. बफर झोनचे नियम न पाळल्याने नागरिकांच्या जीवाला धोका
![Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC स्फोट बॉयलरचा नव्हे, तर कशाचा? अग्निशमन दलाची माहिती, बफर झोनबाबत धक्कादायक माहिती Dombivli MIDC blast happened due to reactor not because of boiler MIDC buffer zone rules not followed Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC स्फोट बॉयलरचा नव्हे, तर कशाचा? अग्निशमन दलाची माहिती, बफर झोनबाबत धक्कादायक माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/24/a70330a2073873e1d11e11ed51f27d711716532308512954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
डोंबिवली: डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. कालपर्यंत ही दुर्घटना केमिकल कंपनीतील बॉयलरच्या स्फोटामुळे (Dombivli Blast) घडल्याचे सांगितले जात होते. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत एक नवीन माहिती दिली. आम्ही सकाळी या कंपनीत सर्वेक्षण केले. त्यावेळी अमुदान कंपनीत बॉयलर अस्तित्त्वातच नसल्याचे दिसून आले. हा जो स्फोट झाला आहे तो बॉयलर नव्हे तर रिअॅक्टरमुळे झाल्याचे दिसत आहे. आम्हाला रिअॅक्टरचा पाया आणि काही तुकडे याठिकाणी दिसून आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दोन प्रकारचे रिऍक्टर असतात, त्यापैकी हा एक असावा. सध्या डोंबिवली एमआयडीसीमध्ये (MIDC) 90 रिअॅक्टर सुरू आहेत, ज्यांची तपासणी आम्ही केली आहे, जे योग्य स्थितीत आहेत. तर 20 रिअॅक्टर बंद आहेत. अशी माहिती बाष्पके विभागाचे संचालक धवल अंतापुरकर यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनीही एमआयडीसीला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सांगितले की, रिअॅक्टरमध्ये तापमान वाढल्यामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला असावा. संपूर्ण तपासणीनंतर खरं कारण समोर येईल. अमुदान कंपनीत सर्वप्रथम आग लागली, त्यानंतर आग बाजूच्या कंपन्यांम्ध्ये पसरली, असे जाखड यांनी सांगितले.
डोंबिवलीतील जमिनींचा भाव वाढला आणि बफर झोनचे तीनतेरा
या दुर्घटनेनंतर डोंबिवली एमआयडीसीच्या बफर झोनबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1980 मध्ये डोंबिवलीत एमआयडीसी सुरु झाली तेव्हा रहिवासी भाग दूर होता. औद्योगिक वसाहत आणि रहिवासी या दोन्ही भागांमध्ये एक-दीड किलोमीटर अंतराचा बफर झोन होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये डोंबिवलीतील जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे निवासी संकुले उभारण्यासाठी बफर झोनचा वापर होऊ लागला. अलीकडच्या काळात एमआयडीसी परिसराच्या अगदी जवळ निवासी इमारती उभ्या राहिल्या आहे. काही ठिकाणी रहिवासी आणि इमारती आणि एमआयडीतील कंपन्यांची भिंतही कॉमन आहे. गेल्या काही वर्षांमध्ये औद्योगिक कारणासाठी राखून ठेवलेले डोंबिवलीतील जवळपास 500 भूखंड बिल्डरांनी गिळंकृत केले. त्यावेळी एमआयडीसीने नोटीस पाठवण्यापलीकडे काहीच केले नाही, अशी माहिती कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)