(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वकील महिलेचा फोटो काढला, वकिलांनी फोटो काढणाऱ्यास चोपला; विकृत व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सापडले महिलांचे 60 हजाराहून अधिक फोटो
Bhiwandi Viral New: भिवंडी न्यायालयात वकील महिलेचे फोटो काढणाऱ्या मानसिक विकृतास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिल्याची घटना घडली आहे.
ठाणे: भिवंडी न्यायालयात एका महिला वकिलाचे फोटो मोबाईलवर काढणाऱ्या विकृत तरुणास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून चोप दिल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली असून या विकृत व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यामध्ये तब्बल साठ हजारहून अधिक फोटो सापडले असून ते विविध ठिकाणच्या महिलांचे फोटो असल्याची बाब उघड झाली आहे. या विकृत तरुणास वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात नेत त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वकार अन्सारी (वय 45) असं या व्यक्तीचं नाव असून तो मिल्लत नगरमध्ये राहतो. वकील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी भिवंडी न्यायालयात एका महिला वकिलाचे फोटो या विकृत व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. फोटो काढल्यानंतर तो तिच्याकडे एकटक बघत होता. ही बाब महिला वकिलाच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या वरिष्ठ वकिलांना याबाबत माहिती दिली.
भिवंडी वकील संघटनेचे पदाधिकारी अॅड.मंजित राऊत आणि अॅड. किरण चन्ने यांनी या विकृतास पकडून चोप दिला. त्या व्यक्तीचा मोबाईल जप्त केला असता त्याच्या मोबाईलमध्ये 60 हजारांहून अधिक फोटो सापडले. त्यामध्ये विविध स्थानक आणि भागातील महिलांचे हजारो फोटो असल्याची बाब उघडकीस आली आहे. ही बाब अॅड किरण चन्ने यांना समजताच त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या विकृतास चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांनी या विकृतास आपल्या सहकारी वकिलांसह शांतीनगर पोलीस ठाण्यात नेऊन त्याविरोधात गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे या विकृताने विविध भागातील महिलांचे एवढे फोटो का आणि कशासाठी काढले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. या विकृतास कठोर शिक्षा करावी अशी मागणी अॅ. किरण चन्ने यांनी केली आहे.