Bhiwandi Crime: भिवंडीतील 'सपना' बारवर पोलिसांचा छापा; 10 बारबालांसह 13 जणांवर गुन्हा दाखल
भिवंडीत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली लेडीज बार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. भिवंडीच्या सपना बारमधून 10 बारबालांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हॉटेल मॅनेजरसह 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
Thane Crime News: भिवंडीत लाईव्ह ऑर्केस्टाच्या (Orchestra) नावाखाली सुरू असलेल्या सपना बारवर नारपोली पोलिसांनी छापा टाकला. या बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असताना पोलिसांना आढळून आले. या छापेमारीत पोलिसांनी 10 बारबालांसह हॉटेल मॅनेजर, वेटर अशा 13 जणांना ताब्यात घेतले. नारपोली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.
'जादू है नशा है' गाण्यावर पोलिसांची एंट्री
भिवंडी तालुक्यातील दापोडे रोडजवळ असलेल्या सपना लेडीज बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली तोकडे कपडे घालून आणि अश्लील हावभाव करत बारबाला ग्राहकांना आकर्षित करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर नारपोली पोलिसांनी 4 एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान बारवर छापा टाकला. त्यावेळी, बारमध्ये बसलेल्या ग्राहकांसमोर तोकड्या कपडयांमधील बारबाला 'जादू है नशा है, मदहोशिया है' या हिंदी गाण्यावर अश्लील हावभाव करत असल्याचे आढळून आले.
संबंधित प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी पंचनामा करत बार मॅनेजर अविनाश गोपीनाथ सूर्यवंशी (वय 25), वेटर शंभुनाथ गिरी (वय 49), पवित्र भास्कर भुयान (वय 45) यांच्यासह 10 बारबालांना ताब्यात घेतले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलीस हवालदार भरत नवले यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 294, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करत आहेत.
याआधीही घडले असे प्रकार
यापूर्वीही नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई-नाशिक महामार्गावर ऑर्केस्टा बारच्या नावाखाली 'लवली' बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विभत्स वर्तन करणाऱ्या बारबालांना भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. 'सरकाय लो खटिया...' या हिंदी गाण्यावर ग्राहकांशी अश्लील चाळे करत असतानाच भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला होता. या छापेमारीत 11 बारबालांसह बार चालक, मॅनेजर, कॅशियर, वेटर अशा 16 जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले होते.
भिवंडीत जवळपास 23 ऑर्केस्टा बार
भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई-नाशिक महामार्गावर आणि गोदाम पट्ट्यात सुमारे 23 च्या आसपास बार आहेत. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पॅलेस, नाईट लव्हर्स, सपना, अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पॅलेस, इन्जॉय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी ऑर्केस्टा-डान्स बारचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी भिवंडीतील एका डान्स बारमधील बारबालेवर पैशाची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हापासून उशिरापर्यंत सुरू असलेल्या ऑर्केस्टा बारवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. तरी देखील पुन्हा उशिरापर्यत ऑर्केस्टा बारमध्ये अशी प्रकरणे सुरुच असल्याचे नारपोली पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून समोर आले आहे.
हेही वाचा:
Pune Crime News : जवळच्या मैत्रिणीनेच केली तब्बल 69 लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं?