Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, 'मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले'
Devendra Fadnavis in Mumbai: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना-मनसे युतीची घोषणा केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली आहे.

Devendra Fadnavis on Thackeray Brothers Alliance: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी मुंबईत शिवसेना-मनसे युतीची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे बंधूंची अक्षरश: टर उडवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने फार काहीतरी घडेल, असा कोणाचा समज असेल तर तो बाळबोध आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ठाकरे यांनी सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात केला. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला आहे. त्यामुळे यंदा मुंबईची जनता त्यांच्या भावनिक आवाहनाला भुलणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-मनसे युतीची टिंगल उडवताना जोरदार राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी म्हटले की, मी सहज टीव्ही बघतो होतो. त्यावेळी काही माध्यमं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा कार्यक्रम असा दाखवत होती की, जणूकाही रशिया युक्रेनची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतीन निघाले आणि ही युती झाली. कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायला जे काही करावे लागते तेच हे दोन्ही पक्ष करत आहेत. या दोन्ही पक्षांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे केले आहे. त्यापलीकडे या सगळ्याचा फार काही अन्वयार्थ काढण्याची गरज नाही. यामुळे फारकाही परिणाम होईल, असे वाटत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
ज्याप्रकारे या मंडळींनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवायचे काम केले आणि पाप केले आहे, त्यामुळे मराठी माणूस त्यांच्यासोबत नाही. मुंबईत यांच्यासोबत यायला कोणीही तयार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की भावनिक बोलायचे. पण जनता आता या भावनिक बोलण्याला भुलणारी नाही. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीसाठी आणखी दोन-चार जण सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचे काम बघूनच मतदान करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला आता ठाकरे बंधू काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा























