भिवंडीत ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, 29 वर्षीय इंजिनियरचा जागीच मृत्यू
भिवंडीतील चाविंद्रा-वडपे मार्गावर झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका तरुण इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात निंबवली नाका परिसरात झाला आहे.
Bhiwandi Accident News : भिवंडीतील चाविंद्रा-वडपे मार्गावर झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका तरुण इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात निंबवली नाका परिसरात झाला आहे. मृत तरुणाची ओळख पटली असून विनोद पाटील (वय 29, रा. कशेळी) असे नाव आहे. ट्रक आणि त्याच्या दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली, यामध्ये पाटील यांचा मृत्यू झाला.
मृत तरुण हा वाशिंद येथील एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा वाशिंद येथील एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी परतत असताना ट्रक आणि त्याच्या दुचाकी मध्ये जोरदार धडक झाली आणि या भीषण धडकेत विनोद पाटील ट्रकखाली चिरडला जाऊन जागीच ठार झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. भिवंडी तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने कशेळी व परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचा सविस्तर तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.
कर्जत तालुक्यात विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, गावकऱ्यांचा महावितरणविरोधात संताप
कर्जत तालुक्यातील कळंबोली येथील विद्युत महावितरण लाईट सबस्टेशन परिसरात अर्जुन मोरेश्वर मिणमिणे (वय 39) या व्यक्तीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. मिणमिणे हे झाडांची पाने तोडण्यासाठी गेले असताना झाडाला विद्युत वाहक तार स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अंजप गावातील नागरिकांनी संताप व्यक्त करत मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. घटना घडून तीन तास उलटूनही कोणताही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणाचा निषेध करत उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन सुरू केले आहे.
कल्याणजवळील आंबिवली रेल्वे स्टेशन जवळ रिक्षाचालक दुचाकीस्वारामध्ये राडा
कल्याणजवळील आंबिवली रेल्वे स्टेशन जवळ रिक्षाचालक दुचाकीस्वारामध्ये कट लागल्याच्या वादातून राडा झाला आहे. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























