Bhiwandi : ईदच्या मिरवणुकीत झेंडा उंचावला, तारेचा शॉक लागला आणि तरूण जागीच संपला
Bhiwandi Youth Death : भिवंडीतील ईद-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत झेंडा उंचावत असताना विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
भिवंडी : ईदच्या मिरवणुकीत (Eid e Milad) मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या तरूणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडीमध्ये (Bhiwandi) घडली. आपल्या हातातील झेंडा वरती उंचावताना त्याचा स्पर्श वरच्या विद्युत तारेला झाला आणि त्याच्या शॉकमुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला. अशफाक शेख (वय 21, रा, पिरानी पाडा भिवंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे तो राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.
ईद मिलाद-उन-नबीच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे रझा अकादमी भिवंडी आणि ईद मिलाद ट्रस्ट यांच्या वतीने 19 वी वार्षिक मिरवणूक मोठ्या थाटामाटात कोटर गेट येथून काढण्यात आली. या मिरवणुकीत भिवंडी शहरातील सुमारे दोन ते तीन लाख मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सुरू असलेल्या एका तरुणाच्या हातातील उंच बांबूवरती स्टीलचे चांद तारा अशा झेंडा होता. हाच झेंडा विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Bhiwandi Youth Death : वीजेचा धक्का लागला आणि जागीच मृत्यू
मिळलेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील पिरानी पाडा परिसरातून ईद मिलाद-उन-नबीच्या जुलूस मध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते. त्यामध्ये पिरानी पाड्यात राहणारा मृत अशफाक हा तरुण हातात उंच झेंडे घेऊन जोरदार घोषणा देत होता. अशफाकच्या हातात उंच बांबूवरती स्टीलचा चांद तारा अशा झेंडा होता. तो मिरवणुकीत सहभागी होऊन झेंडा हवेत फडकावत असतानाच त्याच्या हातातील स्टीलचा भाग रस्त्यावरील उंच असलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेला धक्का लागला. त्यामुळे विद्युत तारेचा संपर्कात तोही आल्याने त्याला जोरदार विजेचा झटका बसून त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान ही दुर्दैवी घटना घडताच त्या भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित करून पुन्हा सुरु करण्यात आला. तर अशफाकचा जागीच मृत्यू झाल्याने त्याला रुग्णवाहिकेतून भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केला. या घटनेनंतर मिरवणुकीत शोक व्यक्त केला जात असून तो राहत असलेला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या मिरवणुकीची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली होती.
ही बातमी वाचा:
Eid e Milad 2023 : सोलापुरात पैगंबर मोहम्मद यांच्या जयंती निमित्त शोभायात्रा!