(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"तुमच्या दीड हजारांनी काहीही होणार नाही, आम्हाला लाडकी बहीण नको, न्याय द्या", बदलापूर अत्याचार प्रकरणावर आंदोलक महिलेचा संताप!
बदलापूरमध्ये शाळेतील सफाई कामगाराने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीआ आहे.
ठाणे : बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूरमधील (Badlapur Minor Abuse) एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केलं आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आदोलकांनी घेराव घातला आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच आंदोलनातील एका महिलेने सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल या महिलेने राज्य सरकारला केलाय.
लाडक्या बहिणींच्या मुलीला न्याय द्यायला तुम्ही कुठे आहात?
आम्हाला दहीहंडी नको आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमाला आम्हाला कोणी सेलिब्रिटी नको आहे. पण आम्हाला न्याय हवा आहे. अशा प्रसंगात तुम्ही राजकारणी लोक इथं येऊ शकत नसतील तर तुमचा काय फायदा. तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता मग लाडक्या बहिणींच्या मुलीला न्याय द्यायला तुम्ही कुठे आहात? असा परखड सवाल आंदोलक महिलेने केला.
पाहा व्हिडीओ :
तुमच्या दीड हजार रुपयांनी काहीही होणार नाही
आम्हाला लाडकी बहीण नको आहे. लाडक्या बहिणीच्या मुलींना आधी न्याय द्या. आम्हाला तुमचा पैसा नको आहे. तुमच्या दीड हजार रुपयांनी काहीही होणार नाही. आम्ही प्रशासनाच्या विश्वासावर आमची मुलं सोडतो आणि कामाला जातो. आमची मुलं सुरक्षित नसतील तर आम्ही काम तरी कशासाठी करावं. आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको आहे, अशी संतप्त भावना एका आंदोलक महिलेने व्यक्त केली.
...तर आमच्या मुलींना बाहेर काढताना विचार करावा लागेल
आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा. अशाच घटना घडत राहिल्या तर आमच्या मुलींना आम्हाला घराच्या बाहेर काढताना विचार करावा लागेल. माझी मुलगी सुरक्षित आहे का? आम्ही रोज मुलांना गुड टच, बॅड टच शिकवतो. पण समोरच्या नराधमाला गुड टच, बॅड टच काय असतो हे समजत नसेल तर काय फायदा? असा सवाल या संतप्त महिलेने राज्य सरकारला विचारला.
आता मुलांना शिक्षण देण्याची गरज आहे
आम्ही आमच्या मुलांना शिकवून उपयोग काय? मी जगातल्या सर्व बायकांना सांगेन की तुम्ही मुलींना गुड टच, बॅड टच शिकवू नका. पण आधी मुलांना हे शिकवलं पाहिजे. महिलांची इज्जत करायची असते हे अगोदर मुलांना शिकवणं गरजेचं आहे. प्रत्येक आईने मुलांना शिकवणं गरजेचं आहे, अशा भावना या महिलेने व्यक्त केल्या.
हेही वाचा :
ट्रेन रोखल्या, जोरदार घोषणाबाजी! चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट!