एक्स्प्लोर
तुमचं व्हॉट्सअॅप सांभाळा, नाशकात हॅकर्सचा धुमाकूळ!

नाशिक: तुम्हाला जर तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून व्हॉट्सअॅपवर अश्लिल मेसेज, क्लिप, संशयास्पद संभाषण आलं तर सावध व्हा. कारण राज्यात व्हॉट्सअॅप हॅकर्सचं रॅकेट कार्यरत असल्याचं नाशिकमध्ये समोर आलं आहे.
नाशिकमधील डॉक्टर, मॉडेल, उद्योजक अशा 40 पेक्षा अधिक नेटीझन्सचे व्हॉट्सअॅप हॅक झाले असून सगळ्यांनी सायबर पोलीसांत धाव घेतली आहे.
गेल्या 2 दिवसांपासून डॉ. मनिषा रौंदळ यांच्या नावाने त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांना अश्लिल मेसेज, व्हिडीओ क्लिप पाठवल्या जात आहे. मनिषा यांनी आपला मोबाईल, व्हॉट्सअॅप, नेट सगळं बंद करुन ठेवलं तरी हॅकर्सचे उद्योग सुरु आहेत. त्यांच्या नावाने सोशल मीडीयावरुन अश्लिल मेसेज पाठवले जात आहेत. मैत्रीणीच्या नावाखाली हॅकर्सने केलेल्या व्हॉट्सअॅपवरच्या मेसेजला रिप्लाय देणं मनिषा यांना चांगलंच महागात पडलं.
बरं ही स्थिती केवळ मनिषा रौंदळ यांचीच आहे असं नाही. डॉक्टर सारीका देवरे यांच्या बाबतीतही तसंच झालं आहे. यांनीही काल सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
डॉक्टर मनिषा, सारीका यांच्याप्रमाणंच नाशिक शहरातले अनेक नामवंत डॉक्टर, मॉडेल, खेळाडू, उद्योजक, विद्यार्थी नेटीझन्स या हॅकर्सच्या उपद्रवांनी हैराण झाले आहेत. अनेकांच्या मोबाईल आणि फ्रेण्डलिस्टमधल्या शेकडो- हजारो नेटीझन्सला अशा पध्दतीचे मेसेज हॅकर्सकडून पाठवले जात आहेत. राज्यभरात हे लोण पोहचलं आहे.
व्हॉट्सअॅप डेटा हॅक, ब्लॅकमेलिंग करणाऱ्या हॅकर्सचा धुमाकूळ
नाशिक सायबर पोलीसांकडे गुरुवारपर्यंत सुमारे 40 लोकांनी यासंदर्भातली तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात हॅकर्सच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हॅकर्सच्या उपद्रवांमुळं वैतागलेल्या नाशिककरांनी आपल्या सायबर सिक्युरिटीकडे लक्ष द्यावं. अनोळखी नंबर किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या नावाने आलेल्या संशयास्पद व्यक्तींच्या व्हॉट्सअॅपवरच्या प्रश्नांना उत्तरं देताना काळजी घ्यावी. कुणालाही आपल्या मोबाईलचा वन टाईम पासवर्ड देऊ नये, अनोळखी नंबरवरुन आलेल्या क्लिप्स डाऊनलोड करु नये असं आवाहन सायबर तज्ज्ञांनी केलं आहे. डिजीटल इंडियाकडे वाटचाल करणाऱ्या भारताला सायबर सुरक्षा आणि सायबर अवेअरनेसचीही मोठी गरज आहे. मोबाईल, व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडीयाचा वापर करताना आपल्या सायबर सुरक्षिततेचीही काळजी घेणं प्रत्येकानं क्रमप्राप्त असल्याचं या घटनांवरुन दिसतंय. नाशिक पोलीस हॅकर्सच्या मागावर आहेत. त्यांना पकडून कदाचित शासन होईलही. पण आपण स्वत: काळजी घेऊन आपल्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या संशयास्पद मेसेजपासून नेटीझन्सने स्वत:ला आणि आप्तांनाही दूर ठेवावं. हॅक झाल्यास काय कराल? 1. तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करा आणि रिइन्स्टॉल करा. पुन्हा तुमचा नंबर वापरुन व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर रजिस्ट्रेशन करा. 2. तुमचा सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड कधीच कोणासोबत शेअर करु नका 3. अनोळखी व्यक्तींशी चॅट करणं टाळा 4. फोनवर अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा संबंधित बातम्यानाशिकमध्ये व्हॉट्सअॅप हॅकिंग, सायबर पोलिसांकडे आतापर्यंत 20 तक्रारी
व्हॉट्सअॅप डेटा हॅक, ब्लॅकमेलिंग करणाऱ्या हॅकर्सचा धुमाकूळ
आणखी वाचा























