Technology : सावधान! ग्राहकोपयोगी वस्तूंच्या नावाखाली होतेय फसवणूक; ग्राहकांनी 'अशी' घ्या काळजी
Technology News : आजच्या काळात पाहिल्यास, प्रत्येक घरात काम करण्यासाठी नवीन यंत्राचा, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो.
Technology News : भारतात तब्बल 69% इतका मोठा तंत्रज्ञान प्रणीत घोटाळ्यांचा उच्च दर असून जागतिक स्तरावर हे प्रमाण सर्वाधिक आहे असे नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे. या घोटाळ्यात 31% भारतीयांनी या आपले पैसे गमावले आहेत. आणि आता घरगुती उपकरणांची सेवा घेणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अशा घोटाळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
आजच्या काळात पाहिल्यास, प्रत्येक घरात काम करण्यासाठी नवीन यंत्राचा, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. यामध्ये अगदी भांडी घासण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत, स्वयंपाकापासून ते साफसफाईपर्यंत प्रत्येक कामासाठी लोक तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत. हे यंत्र जर बंद पडलं तर ग्राहक लगेच दुसरा पर्यायी मार्ग शोधतात. इंटरनेटमुळे तर या गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. मात्र, अनेकदा यातून फसवणुकीचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येते.
या संदर्भात गोदरेज अप्लायन्सेसच्या सेवा विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अर्णब बागची यांनी काही मुद्दे सांगितले आहेत.
अनधिकृत सेवा केंद्र तयार करणे : फसवणूक करणारे सेवा केंद्र लोकप्रिय ब्रँडसाठी अधिकृत सेवा केंद्रे म्हणून असल्याचे दाखवतात. सर्च इंजिनवर त्यांचे स्वतःचे नंबर टाकतात. घाईत असलेला ग्राहक हा कंपनीचा सेवा क्रमांक असल्याचे समजून सेवा विनंती बुक करतात. त्यानंतर, ते फसवणूक करून पैसे आकारू शकतात.
अशा फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून ग्राहकांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही सोप्या टिप्स :
ब्रँडची अधिकृत सेवा केंद्रे शोधा : विक्रीपश्चात सेवेचे क्रमांक ऑनलाईन शोधण्याऐवजी प्रथम उत्पादनावरच ब्रँडचा सेवा संपर्क क्रमांक शोधा. जवळपास सर्व नामांकित कंपन्या त्यांच्या उत्पादनांवर टोलफ्री सेवा समर्थन क्रमांक नमूद करतात आणि त्यांच्या ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी या कंपन्यांची अनेक भाषांमध्ये सक्रिय कॉल सेंटर आहेत.
तपशीलांकडे लक्ष द्या : बहुतेक ग्राहक घोटाळ्यांना बळी पडतात कारण त्यांना किरकोळ विसंगती लक्षात येत नाहीत. हे सेटअप अनेकदा ब्रँडच्या नावांची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करत बनावट वेबसाईट तयार करून, काहीवेळा ब्रँडचा लोगो वापरून आणि कॉल त्यांच्या स्वत:च्या नंबरवर वळवून ग्राहकांना फसवतात. त्रुटींकडे लक्ष दिले तर ग्राहकांना फिशिंग वेबसाईट ओळखण्यात मदत होऊ शकते.
आगाऊ पैसे देण्यास सांगितल्यावर सावध रहा : जेव्हा तुम्हाला कोणत्याही सेवेसाठी किंवा नॉन-ब्रँडेड किंवा अज्ञात सेवा व्यक्तींकडून दुरुस्तीसाठी आगाऊ पैसे देण्यास सांगितले जाते तेव्हा तुम्ही घोटाळ्याचे बळी होण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याचप्रमाणे ग्राहकांनी बनावट फोन-कॉलपासून सावध राहणे आवश्यक आहे. त्यात वार्षिक उत्पादन सेवा देय आहे असे नमूद केले जाते आणि भेटीपूर्वी पैशांची मागणी केली जाते. ते असा दावा करू शकतात की तुम्ही काही फी भरल्यानंतर प्रशिक्षित तंत्रज्ञ समस्या सोडवण्यासाठी भेट देतील. तुम्ही आगाऊ पैसे भरल्यास, ते पैसे घेऊन गायब होऊ शकतात.