(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Instagram Down : भारतासह जगभरात इन्स्टाग्राम डाऊन; यूजर्सची सोशल मीडियावर तक्रार
इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर अडचणी आल्याने आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त यूजर्सनी वेबसाईटवर या समस्येची तक्रार केली आहे.
मुंबई : फेसबुकच्या मालकीचे अॅप इन्स्टाग्राम अचानक भारतात आणि जगाच्या काही भागात डाऊन झाले आहे. इन्स्टाग्राम आपले सर्व्हर व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसोबत शेअर करते. परंतु या दोन अॅप्समध्ये कोणतीही समस्या नाही. मात्र इंस्टाग्रामचं अॅप अँड्रॉइड आणि iOS डिव्हाईसवर काम करत नाहीये. अनेक यूजर्सनी याबाबत तक्रार केली आहे.
45 टक्क्याहून अधिक यूजर्सची तक्रार
डाऊन डिटेक्टर वेबसाइटनुसार, भारतात आज सकाळी 11 वाजता इन्स्टाग्रामवर समस्या येऊ लागल्या. सुमारे 45 टक्के इंस्टाग्राम यूजर्सनी अॅपबद्दल तक्रार केली आहे, तर 33 टक्के वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम वेबसाईटवर वापरताना समस्या येत आहेत. आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त यूजर्सनी वेबसाईटवर या समस्येची तक्रार केली आहे.
अनेकांची ट्विटरवर तक्रार
इन्स्टाग्राम यूजर्सनी ट्वीट करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरुन फक्त त्यांना ही समस्या येत आहे की अनेकांना येत आहे हे समजेल. ट्विटरवर लोक सातत्याने याबद्दल तक्रार करत आहेत.
याआधीही इन्स्टाग्राम झालं होतं डाऊन
याआधीही काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्राम डाऊन झाले होते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि वॉशिंग्टन डीसीमधून मोठ्या प्रमाणावर आऊटेज झाल्याची माहिती मिळाली होती.
कंपनीने म्हटलं की, इन्स्टाग्राम यूजर्सनी अॅप पुन्हा इन्स्टॉल करू नये, कारण यामुळे समस्या सुटणार नाही. समस्या कंपनीच्या सर्व्हरमधून आहे आणि काही वेळात ही समस्या दूर होईल, असं आश्वासन कंपनीने दिलं आहे.