(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : सोलापुरहून मराठवाड्यात जाणारी बस सेवा बंद; लातूर, बीड, परभणी, संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द
Maratha Reservation : विशेष म्हणजे, सोलापूरहून लातूर, बीड, परभणी, संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सोलापूर : पोलीस विभागाकडून एसटी महामंडळाला संवेदनशील भागातील वाहतूक बंद करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. तर, पोलिसांच्या सूचनेनुसार आज सकाळपासून परभणी, बीड, धाराशिव जालना, नांदेड व लातूर विभागातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. सोबतच नाशिकसह सोलापूरमधून मराठवाड्यात येणाऱ्या बसेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर विभागातील काही आगारांची अंशतः वाहतूक सुरू आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी याबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, सोलापूरहून लातूर, बीड, परभणी, संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाहतूक सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळ निर्णय घेत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील गाड्यांना जाळ्या लावण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचा एसटी सेवेवर परिणाम होतांना दिसत आहे.
सोलापुरहून मराठवाड्यात जाणारी बस सेवा बंद
सोलापुरातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्या आज सकाळपासून रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, लातूर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून रात्री मुक्कामी येणाऱ्या बसेस सोलापुरात आल्या नाहीत. परिणामी आज सकाळपासून लातूर, बीड, परभणी, संभाजीनगरकडे जाणाऱ्या 25 हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील केवळ सोलापूर-धाराशिव या मार्गवर सध्या एसटी सुरु असून, त्याचे ही प्रमाण कमी आहे. अचानक एसटी सेवा रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण होतांना दिसत आहे.
नाशिकहून मराठवाड्यात येणाऱ्या बसेस देखील थांबवल्या...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तापले असून, याचे परिणाम राज्यातील एसटी महामंडळाच्या बससेवांवर जाणवू लागला आहे. कालपासून मराठवाड्यातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नाशिकमधूनही मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून एकही बस छत्रपती संभाजीनगर, जालनाच्या दिशेनं गेल्या नाहीत. तसेच मराठवाड्याकडून नाशिकला एकही बस मुक्कामी अली नसल्याचे एसटी महामंडळ वाहतूक नियंत्रकाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका आता दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांना बसतांना पाहायला मिळत आहे. तर अनेकांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मराठा आरक्षण! नांदेड जिल्ह्यात एसटीचे चाक थांबले, आतापर्यंत 55 ते 60 लाखाचे नुकसान