![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pandharpur News : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! चैत्री यात्रेनिमित्त दिवसभर घेता येणार विठुरायाचे मुखदर्शन
Pandharpur News : चैत्री यात्रा 15 ते 21 एप्रिल दरम्यान होणार असून भाविकांना यात्रा काळात पहाटे पाच वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे.
![Pandharpur News : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! चैत्री यात्रेनिमित्त दिवसभर घेता येणार विठुरायाचे मुखदर्शन Preparations for Chaitri Yatra started in Pandharpur Vitthal Rukmini Temple Vitthal darshan can be taken all day long Maharashtra Marathi News Pandharpur News : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! चैत्री यात्रेनिमित्त दिवसभर घेता येणार विठुरायाचे मुखदर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/9952e0c4fc3d0775f339b1a0182188151712235480020923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pandharpur News : वारकरी (Warkari) संप्रदायातील चार मोठ्या यात्रांपैकी एक असणारी चैत्री यात्रा 15 ते 21 एप्रिल दरम्यान होणार असून भाविकांना या यात्राकाळात पहाटे पाच वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत विठुरायाचे मुखदर्शन (Vitthal Rukmini Mandir Pandharpur) घेता येणार आहे. आज चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन इथापे (Sachin Ithape) यांनी प्रशासनाची बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या.
सध्या विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु असल्याने विठुराया काचपेटीत असून देवाच्या पायावरील दर्शन पूर्ण बंद आहे. पहाटे पाच ते सकाळी १० वाजेपर्यंत विठुरायाचे केवळ मुखदर्शन भाविकांना घेता येत आहे. मात्र चैत्री यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने संपूर्ण यात्रा कालावधीमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत विठुरायाचे मुखदर्शन सुरु ठेवण्यात येणार आहे. यासाठी गोपाळपूर येथे 8 पत्र्याचे शेड उभारण्याचे काम सुरु असून उन्हाळ्याची परिस्थिती असल्याने संपूर्ण दर्शन रांगेत पंखे, कुलर आणि थंड पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या आहेत. चैत्री शुध्द एकादशी ही १९ एप्रिल रोजी आहे. यादिवशी भाविकांची सर्वात जास्त संख्या असणार आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध ठेवावी, अशा सूचनाही करण्यात आलेल्या आहेत.
सुलभ दर्शन व्यवस्थेबाबत नियोजन करावे
मंदिर समितीने दर्शन रांग व पत्र्याच्या शेडमध्ये पंखे, कुलर्स मॅट, स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. भाविकांना तात्काळ व सुलभ दर्शन व्यवस्थेबाबत नियोजन करावे. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांसाठी मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगरपालिकेने नियोजन करावे. आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याची टँकरची संख्या वाढवावी. नदीपात्रातील व घाटाची स्वच्छता करावी, अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे. येणाऱ्या भाविकांना व शहर वासियांना वारी कालावधीत व वारीनंतर अस्वच्छतेमुळे त्रास होणार याची दक्षता घ्यावी.
24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना
फिरत्या अतिक्रमण पथकांची उपलब्धता ठेवावी. अन्न व औषध प्रशासनाने खाद्य पदार्थांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके नेमून मोहिम राबवावी. आरोग्य विभागाने वारी कालावधीत वैद्यकीय पथके कार्यरत ठेवावी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा. वीज वितरण कंपनीने सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा सुरु ठेवावा. एस.टी. महामंडळाने प्रवाशांसाठी बस स्थानकात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, याची व्यवस्था करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी यावेळी दिल्या आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)