Rohit Arya Encounter: एकनाथ शिंदेंसोबत गप्पा मारतानाचे फोटो, रोहित आर्य ज्या योजनेमुळे आयुष्यातून उठला ती महत्त्वाकांक्षी सरकारी योजना नेमकी काय होती?
Rohit Arya Encountr: मुंबईतील पवई परिसरात आर. ए. स्टुडिओमध्ये 20 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्या पोलिस चकमकीत ठार झाला होता. मात्र, या सगळ्यामागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा.

Rohit Arya Encounter: मुंबईच्या पवई परिसरात रोहित आर्य या व्यक्तीने 17 जणांना ओलीस ठेवल्याची थरारक घटना गुरुवारी घडली होती. रोहित आर्य याने 17 मुलांना सरकारी जाहिरातीसाठी ऑडिशनच्या नावाखाली पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये बोलावले होते आणि त्यांना ओलीस ठेवले होते. अखेर मुंबई पोलिसांनी त्याच्या छातीत गोळी मारुन त्याचा एन्काऊंटर केला. या सगळ्या घटनेनंतर रोहित आर्य (Rohit Arya) याच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली होती. रोहित आर्य याने वर्षभरापूर्वी शिंदे सरकारच्या काळात एका सरकारी योजनेचे काम केले होते. मात्र, या योजनेचे तब्बल 2 कोटी रुपयांचे देणे सरकारने थकवले होते. याविरोधात रोहित आर्य याने उपोषणही केले होते. मात्र, त्याला सरकारी यंत्रणने दाद न मिळाल्यामुळे रोहित आर्य प्रचंड नैराश्यात होता. याच नैराश्याच्या भरात रोहित आर्य याने 17 जणांना ओलीस ठेवले होते. (Mumbai News)
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुरज लोखंडे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना याबाबत माहिती दिली. गेल्यावर्षी 20 ऑगस्टला आम्ही पत्रकार भवनातून बाहेर पडत असताना एक व्यक्ती रस्त्यावर बेशुद्ध पडलेली आम्हाला दिसली. आम्ही त्या व्यक्तीचा विचारपूस केली तेव्हा त्याने आम्हाला राज्य सरकारशी केलेला पत्रव्यवहार दाखवला. त्यावेळी आम्हाला समजले की, हा माणूस 16 ते 17 दिवस आमरण उपोषण करत होता. आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलो तेव्हा कुटुंबीयांनी रोहित आर्य यांचे पैसे राज्य सरकारने थकवल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना' राबवण्यात आली होती. याच योजनेतंर्गत रोहित आर्य यांनी 'स्वच्छता मॉनिटर' हा उपक्रम राबवला होता.
त्यासाठी रोहित आर्य यांनी स्वत:चे घर आणि दागिने विकले होते. पण 'स्वच्छता मॉनिटर' उपक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांना कुठलेच पैसे दिले नाहीत. त्यामुळे रोहित आर्य यांनी दीपक केसरकर यांच्याविरोधात दोनवेळा उपोषणही केले होते. मात्र, त्यांच्याकडूनही केवळ आश्वासन मिळाल्याने रोहित आर्य प्रचंड नैराश्यात असल्याचे सुरज लोखंडे यांनी सांगितले. रोहित आर्य यांना एक मुलगा आहे. त्यांची पत्नी आयसीआयसीआय बँकेत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे.
Mukhyamantri mazi shala sundar shala: रोहित आर्य ज्या सरकारी योजनेमुळे आयुष्यातून उठला ती सरकारी योजना नेमकी काय होती?
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर शिंदे सरकारच्या अनेक योजनांना कात्री लावली होती. काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारच्या काळात सुरु झालेली 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना' बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. यापूर्वी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पान हे उपक्रमही बंद करण्यात आले होते. राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांचे आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 2023 शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांमध्ये स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात आली. त्यामुळे राज्यातील शिक्षण संस्थांसह विद्यार्थी आणि पालकांमध्येही या योजनेची चर्चा होती. मात्र, आता निधीच्या कमतरतेमुळे या योजनेचा गाशा गुंडाळण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
'आनंदाच्या शिधा'नंतर एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद?; लाखो रुपयांची दिली होती पारितोषिके























