(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिर कात टाकतंय! काळ्या दगडाची फ्लोरिंग, 73 कोटींच्या विकास आराखड्याला जोरात सुरुवात
Vitthal Mandir News Update : पंढरपूर विठ्ठल मंदिर विकासाच्या 73 कोटींच्या विकास आराखड्याला जोरात सुरुवात झाली असून संपूर्ण मंदिरात आता पूर्वीच्याप्रमाणे दगडी फ्लोरिंग असणार आहे.
Pandharpur News : ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर (Vitthal Temple) कसं असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली असली तरी लवकरच हे रूप जगभरातील विठ्ठल भक्तांना पाहायला मिळणार आहे. यासाठी मंदिर विकासाच्या 73 कोटींच्या विकास आराखड्याला (Vitthal Temple Development Plan) जोरात सुरुवात झाली असून संपूर्ण मंदिरात आता पूर्वीच्याप्रमाणे दगडी फ्लोरिंग असणार आहे. यासाठी देगलूर येथील काळ्या पाषाणाच्या खाणीतून दगड आणला जात असून हे दगड घडविण्याचं काम रात्रंदिवस करण्यात येत आहे.
विठ्ठल मंदिर कात टाकतंय!
मंदिर समितीच्या एमटीडीसीच्या जागेतील भक्त निवासात हा कारखाना सुरु झाला आहे. याठिकाणी देगलूर येथून काळ्या पाषाणाचे मोठं-मोठे दगड आणण्यात येत आहेत. या कारखान्यात दगड बारीक आकारात कापून घेऊन लातूर येथील कारागीर ते घडविण्याचं काम करत आहेत. मंदिरात गरजेनुसार या दगडी फरशांचा आकार बनविला जात असून सर्वसामान्यपणे दीड फूट बाय दोन फूट आकारात या फारशा घडविण्याचं काम सुरु आहे. या दगडी फरश्यांवरून भाविक घसरू नयेत यासाठी या फरशांना मशीनच्या मदतीने टाचे मारण्यात येत आहेत. या तयार झालेल्या दगडी फरशा मंदिरात बसविण्यासाठी पाठवून देण्यात येत आहेत.
विठ्ठल मंदिरासाठी काळ्या पाषाणाची दगडी फ्लोरिंग
सध्या बाजीराव पडसाळी येथील मंदिराच्या भागात काम सुरु असून हा संपूर्ण भाग मंदिरापासून वेगळा करण्यात आला आहे. या ठिकाणी मंदिराचे काम सुरु झसल्याने भाविकांना या भागात प्रवेश बंद करण्यात आला आहे. या भागात असणारे व्यंकटेश, महालक्ष्मी अशा परिवार देवतांना नित्योपचार नियमितपणे सुरु असले तरी भाविकांना या भागात प्रवेश दिला जात नाही. सध्या या भागातील दगडी ओवऱ्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येथील दगडी बांधकामावर वाळूचा प्रेशरने मारा करून या पुरातन दगडावरील चढलेले घाणीचे थर काढल्याने हे दगड एकदम नव्यासारखे दिसू लागले आहेत.
73 कोटींच्या विकास आराखड्याला जोरात सुरुवात
सध्या बाजीराव पडसाळी येथे असणाऱ्या दीपमाळेचे साफसफाई आणि मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. याशिवाय महालक्ष्मी मंदिरावर असणारे नंतरचे बांधकाम देखील पाडण्यात येत आहे. सध्या पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हि कामे सुरु असून मंदिरातील सिमेंट काँक्रीटचे काम पाडण्यात येत आहे. विठ्ठल मंदिराच्या 73 कोटी विकास आराखड्याचे (Pandharpur Development Plan) काम मुंबई येथील सावनी हेरिटेज अँड कॉन्सर्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत आहे.