Pandharpur News : नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी राम मंदिर उद्घाटनाची अक्षता विठुरायाला मिळणार, माऊलींचे चांदीचे पसायदान देणार अयोध्येला भेट
Pandharpur News : अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची निमंत्रण पत्रिका हा विठुरायाला देण्यात येणार आहे.
पंढरपूर : पाचशे वर्षानंतर जगातल्या सर्वात देखण्या मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र 22 जानेवारी 2024 रोजी प्रवेश करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याचसाठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी न्यासाचे आचार्य किशोरजी व्यास हे विठुरायाला निमंत्रणाच्या अक्षता देण्यासाठी येत आहे. सकाळी ते विठ्ठल मंदिरात (Vitthal Mandir) जाऊन देवाच्या पायावर राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता ठेवतील. तसेच रामरायाला विठुरायाकडून ज्ञानेश्वर माऊलींचे चांदीचे पसायदान भेट म्हणून देण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी विठुरायाकडून रामरायाला संत ज्ञानेश्वर माऊलींचे चांदीचे पसायदान संत मंडळी अर्पण करणार आहेत.संपूर्ण चांदीत असणारे हे पसायदान 2 बाय 3 फूट आकारात बनवण्यात आले आहे. हे पसायदान चांदीच्या पत्र्यावर कोरण्यात येणार आहे. तसेच हे पसायदान मराठी , हिंदी आणि इंग्रजी भाषेत बनविण्याचा प्रयत्न सध्या सुरु करण्यात आलाय. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी आचार्य किशोरजी व्यास यांचे मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पसायदान मंदिरात लावतील. विठुरायाची ही भेट अनोखी भेट घेऊन वारकरी संप्रदायाचे संत आणि संतांचे वंशज पोहचतील.
प्रमुख संतमंडळींना सोहळ्याचे निमंत्रण
अयोध्येच्या राम मंदिरात पसायदान कायमस्वरूपी येणाऱ्या लाखो भाविकांना प्रेरणा आणि विठुरायाची आठवण देत राहावी असा या संतांचा मानस आहे . या सोहळ्यासाठी पंढरपुरातील पंधरापेक्षा जास्त संत महंतांना यापूर्वीच निमंत्रण मिळाले आहे. यात संत तुकाराम महाराज , संत नामदेव महाराज , संत एकनाथ महाराज यांचे वंशज असतील. याशिवाय वारकरी संप्रदायातील प्रमुख संतमंडळींनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे . यामध्ये ह.भ.प.श्री.देवव्रत(राणा) महाराज वासकर , ह.भ.प.प्रा.श्री.बाळासाहेब महाराज देहूकर , ह.भ.प.श्री.जयवंत महाराज बोधले , ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर , ह.भ.प.श्री.विठ्ठल महाराज चवरे , ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज मोरे(देहूकर) , ह.भ.प.श्री.भाऊसाहेब महाराज गोसावी , ह.भ.प.श्री.शाम महाराज उखळीकर , ह.भ.प.श्री. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर , ह.भ.प.श्री.भागवत महाराज शिरवळकर , ह.भ.प.श्री. रघुनाथ महाराज कबीर , ह.भ.प.श्री.आशुतोष महाराज बडवे , ह.भ.प.श्री.ह्रषीकेश महाराज उत्पात , ह.भ.प.श्री.श्रीकांत महाराज हरिदास , ह.भ.प.श्री.भागवत महाराज चवरे , ह.भ.प.श्री.मारुती महाराज तुणतुणे (शास्त्री) , ह.भ.प.श्री.माधव महाराज शिवणीकर ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांचा समावेश आहे . ही सगळी संत मंडळी 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या सोहळ्यासाठी अयोध्येत जाणार आहेत.