Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांची भूक भागवणारा कर्नाटकी अवलिया; करतो हजारोंना पंचपक्वान्नाचं अन्नदान
Ashadhi Wari 2023 : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याच्या जमखंडी तालुक्यातील बंडीगणी मठाचे मठाधिपती चक्रवर्ती दानेश्वर महाराज आणि त्यांचे शिष्य गेली वर्षानुवर्ष हे व्रत सेवा म्हणून करत आले आहेत.
Maharashtra Ashadhi Wari 2023 : आषाढी सोहळ्यात (Aashadhi Ekadashi) विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येत भाविक येत असतात. मात्र पंढरीत येऊन देखील देवळात न जाता सर्वसामान्य भाविकांच्या भुकेत विठुरायाच्या दर्शनाचं समाधान घेणारा एक कर्नाटकी अवलिया गेली 43 वर्ष अखंड दर्शन रांगेतील हजारो भाविकांना पंचपक्वान्नांच्या भोजनाची सेवा देत आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याच्या जमखंडी तालुक्यातील बंडीगणी मठाचे मठाधिपती चक्रवर्ती दानेश्वर महाराज आणि त्यांचे शिष्य गेली वर्षानुवर्ष हे व्रत सेवा म्हणून करत आले आहेत.
आपल्या मठातून शेकडो टन धान्य, भाजीपाल्यापासून जळाऊ लाकडापर्यंत सर्व सामान विविध ट्रकमध्ये भरून गोपाळपुराच्या पत्राशेडमध्ये पोहोचवत असतात. आषाढीची दर्शन रांग या भागात पोहोचताच या अन्नपूर्णेची भट्टी पेटती, अजस्त्र चुलीवर मोठमोठाले पातेली आणि काढयांत पक्वांन्न शिजायला सुरुवात होते आणि सुरु होतं 24 तास चालणारं मोफत भोजनगृह, पहाटे दोन तास चहासोबत नाश्ता आणि नंतर दिवस रात्र भात, पोळ्या, मसालेभात, गव्हाची खीर, जिलेबी, भजी, आंब्याचा रस, बुंदीचे लाडू आणि टिपिकल कर्नाटकी पद्धतीच्या भाज्या... तुम्ही दर्शन रांगेनं गोपाळपुरातील पत्राशेडवर पोहोचलात की, तुम्हाला रांगेतच हातातून खाण्याचे पदार्थ देण्यास सुरुवात होते. दिवसरात्र 500 ते 700 शिष्यगण अखंड वारकऱ्यांची भूक भागविण्याचं काम करत असतात. तर सोबत आलेल्या 500 पेक्षा जास्त महिला अखंड स्वयंपाकाची तयारी करण्यात मग्न असतात.
अतिशय स्वच्छ पद्धतीनं बनविलेल्या या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत आपली भूक शमविण्यासाठी दर्शन रांगेतील प्रत्येक भाविक दानेश्वर महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी धडपडत असतो. रोज लाख ते सव्वा लाख भाविकांची भूक भागविण्याची सेवा हे शिष्यगण या अन्नछत्रातून करीत असतात . रोज हजारो वारकर्यांना मिळणाऱ्या या मोफत भोजनामुळे आता प्रशासनाने देखील दर्शन रांगेतील 10 पत्रा शेडच्या जवळ या अवलियाला यात्रेसाठी खास जागा राखून ठेवलेली असते. चक्रवर्ती दानेश्वर महाराज महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील जवळपास 180 ठिकाणच्या यात्रामधून अन्नदान करतात. वर्षातील 265 दिवस ते विविध भागातील अन्नदानासाठी सेवा देत असतात. कोणी मंदिरात देव पाहतो तर कोणी कष्ट मात्र कर्नाटकातील हा अवलिया वारकऱ्यांच्या भुकेच्या विठ्ठलाचे दर्शन घेतो आणि म्हणूनच दानेश्वर महाराजांना आषाढी यात्रेत कधी विठ्ठल मंदिरात जाण्याची गरज पडत नाही, रोज हजारो विठ्ठल त्यांना दुवा देत दर्शन देत असतात.
महत्त्वाच्या इतरल बातम्या :