(Source: Poll of Polls)
दोन वर्षांनी भरलेल्या कार्तिकी जनावरांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल; पंढरपूरच्या कपिला गाईला सर्वाधिक बोली
राज्यातील अनेक भागात दुष्काळाचे सावट असल्याने आपल्याजवळील चांगल्या दर्जाचे पशुधन पोसणे शेतकऱ्याला अडचणीचे बनले होते. यामुळेच यंदा कार्तिकीच्या बाजारात जवळपास साडेचार ते पाच हजार जनावरे दाखल झाली होती.
पंढरपूर: कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi) भरलेल्या जनावरांच्या बाजारात तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला यामुळे दिलासा मिळाला आहे. यंदा कार्तिकीचा गुरांचा बाजार भरणार की नाही याबाबत साशंकता असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेत येणाऱ्या सर्व जनावरांची तपासणी करून बाजार भरवण्यात आला होता. यामुळे अनेक चांगल्या दर्जाची खोडे , देशी गाई , बैले ,पंढरपूरी म्हशी या बाजारात आल्या होत्या.
राज्यातील अनेक भागात दुष्काळाचे सावट असल्याने आपल्याजवळील चांगल्या दर्जाचे पशुधन पोसणे शेतकऱ्याला अडचणीचे बनले होते. यामुळेच यंदा कार्तिकीच्या बाजारात जवळपास साडेचार ते पाच हजार जनावरे दाखल झाली होती. त्यामध्ये दोन हजारांहून अधिक जनावरांची विक्री झाली असून दोन कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. या बाजारात पंढरपूरच्या पैलवान नितीन घंटे यांच्या कपिला गाईला तब्बल पाच लाखांची सर्वाधिक बोली लावण्यात आली. बाजार समितीकडे नोंदणी न करताच हजारो जनावरांची खरेदी विक्री झाली. त्यामुळे बाजार समितीला आर्थिक नुकसान होणार असले तरी चुकीच्या खरेदीचा फटका पशुपालकांनाही बसला आहे.
चार दिवसांत 3345 जनावरांची नोंद
कार्तिकी यात्रेनिमित्त तीन वर्षानंतर वाखरी येथील पालखी तळावर तीन ते चार दिवस जनावरांचा बाजार भरलेला होता. चार दिवसांत बाजार समितीकडे तीन हजार 345 जनावरांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक बैल, खिलार गाय, म्हैस आणि रेडा, संकरीत गाई, अशी जनावरे विक्रीसाठी आली होती. तीन वर्षानंतर बाजार भरला असल्याने जनावरांची आवक मोठ्या संख्येने झाल्याने पालखी तळाची जागा अपुरी पडल्याच दिसत होत.त्यामुळे आसपासच्या खाजगी जागेत जनावरे बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. चार दिवसांच्या या बाजारात 1804 जनावरांची अधिकृत विक्री झाली असून एकूण नोंदी नसलेल्या अनेक जनावरांचीही येथे विक्री झाल्याचे दिसत होते. सहा महिन्याच्या खोंडास दहा हजार रुपयांपर्यंत किंमत आली असून बैलांचे व्यवहार 50 ते 60 हजार रुपये तर म्हशींच्या किंमती लाखांच्या वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद
तीन वर्षानंतर भरलेल्या जनावरे बाजारात पशु पालकांना बाजार समितीने लाईट, पाणी, वैद्यकीय सुविधा पुरविल्या, जागा, स्वच्छता ही करून दिली. त्यामुळे या बाजाराला राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. या बाजारात येणाऱ्या प्रत्येक जनावरांची तपासणी केल्याने एकही लम्पी जनावरे विक्रीसाठी ठेवण्यात आले नव्हते. तपासणी झालेल्या जनावरांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने स्टॅम्पिंग केल्याने व्यापाऱ्यांना हे शिक्के बघून व्यवहार करणे सोपे गेले. या तपासणीमध्ये केवळ पाच जनावरे लम्पीबाधित आढळल्याने त्यांना परत पाठविण्यात आल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. या बाजारात कोल्हापूर , पुण्यासह विदर्भातील अनेक व्यापाऱ्यांनी चढ्या भावाने जनावरांची खरेदी केल्याचे दिसून आले .