Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळा, महाराष्ट्रात आतापर्यंत कोणाला मिळालं आमंत्रण?
Ram Mandir Inauguration Ceremony : वारकरी संप्रदाय आणि संत विभूती आयोध्येतील राममंदिर (Ram Mandir) उद्घाटनप्रसंगी सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.
Solapur News: सोलापूर (पंढरपूर) : आयोध्येतील राममंदिर (Ram Mandir) उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरमधील (Pandharpur) अनेकांना निमंत्रण मिळाले असून, वारकरी संप्रदाय आणि संत विभूती या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत. राममंदिराचा लढा गेले कित्येक वर्षे चालल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होत असताना, या सोहळ्याला वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बडवे समाजातील थोर संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज, रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात, देवाचे सेवाधारी आणि ज्याच्याघरी 400 वर्षांपासून पांडुरंगाच्या पादुका असणारे हरिदास अशा मान्यवरांना राम मंदिर केंद्रीय समितीकडून उदघाटन सोहळ्यासाठी निमंत्रण प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रातील इतिहासातील 300 वर्षांपूर्वी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला देखील त्यावेळी प्रल्हाद महाराज बडवे याना निमंत्रण मिळाल्याचा इतिहास आहे. 22 जानेवारीला नियोजित या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून, निमंत्रितामध्ये कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टर, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, राममंदिर संघर्षात प्राण गमावलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
परंपरा जोपासणाऱ्या साधुसंतांना आमंत्रण
पांडुरंगाचे परंपरागत प्रमुख पुजारी म्हणून बडवे यांच्यासह सेवेधारी मंडळी पैकी पांडुरंगाच्या पादुका असणाऱ्या काल्याच्या वाड्यातील मदन महाराज हरिदास यांच्याबरोबर रूक्मिणीचे वंशपरंपरागत पुजारी उत्पात यांनाही खास निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्रची थोर संत व वारकरी संप्रदायाचे महत्व जाणून महान संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या वंशज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्त वासकर महाराजांबरोबर, देगलूरकर महाराज व इतर महत्त्वाचे परंपरा जोपासणाऱ्या साधुसंतांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
सोहळ्यासाठी सुमारे 4000 ऋषी आमंत्रित
मुख्य समारंभासाठी विश्व हिंदू परिषदेचे सुमारे 100 सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 25 अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. तर, माजी पंतप्रधान देवेगौडा यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी तीन सदस्यीय चमू तयार करण्यात आले आहे. यासह शंकराचार्य सुद्धा सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यासाठी सुमारे 4000 ऋषी आणि 2200 इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. पंढरपूरमधील व्यक्तींना आमंत्रित करताना वारकरी परंपरा जोपासणाऱ्या साधुसंतांना आमंत्रित केल्याने विशेष आनंद या मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: