Onion Price : 10 पोते कांदा विकल्यावर शेतकऱ्याला मिळाले फक्त दोन रुपये... ते ही चेकद्वारे..!
Onion Price : सोलापूर बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले.
Onion Price : सध्या कांदा (Onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टींनी (Raju Shetti) चांगलाच संताप व्यक्त केला आहे. निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रुपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलाय.
सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिला
आधीच शेतकरी वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत आहेत. अशातच आता पुन्हा शेतमालाच्या दरात घसरण झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात 17 फेब्रुवारीला जवळपास पाचशे किलो कांदा विकला होता. मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक शेतकऱ्याला दिला आहे. मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करुन शेतकऱ्याला फक्त दोन रुपये शिल्लक राहिले होते. सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक देत शेतकऱ्याची थट्टा केली आहे.
राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले,
— Raju Shetti (@rajushetti) February 22, 2023
शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? राजू शेट्टींचा सवाल
10 पोती कांद्याची विक्री करुन शेतकऱ्याला 512 रुपये मिळाले होते. मोटारभाडे, हमाली, तोलाई असा सगळा खर्च 510 रुपये आला. शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. या प्रकारानंतर राजू शेट्टींनी ट्वीट करत या घटनेचा निषेध केला आहे. राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलाय. एका बाजूला थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्यासमोर पीक करपून जात असल्याचे शेट्टी म्हणाले.
किसान सभेचा सरकारला इशारा
सध्या बाजारपेठेत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात किलोमागे पाच ते आठ रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. राज्यातील भाजप-शिंदे सरकारनं (BJP-Shinde Govt) तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं करण्यात आली आहे. सरकारने कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन किसान सभा हातात घेईल, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिलाय. सत्ताधाऱ्यांनी सत्ताखेळ थांबवावा आणि कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: