(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ujani Dam : उजनी धरणातून 40 हजार क्यूसेकने भीमा नदीत विसर्ग सुरु, नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उजनी धरणाच्या 16 दरवाज्यातून 40 हजार क्यूसेकने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Ujani Dam : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांसह धरणांच्या पाठीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. उजनी धरण (Ujani Dam) परिसरातही चांगला पाऊस पडत आहे. दुसरीकडं पुढे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळं त्या धरणांतून उजनीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं उजनी धरणही 100 टक्के भरलं आहे. त्यामुळं आता उजनी धरणाच्या 16 दरवाज्यातून 40 हजार क्यूसेकने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वीर धरणातून 23 हजार विसर्गाने पाणी नीरा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळं आता नीरा आणि भीमा नदीचे पाणी संगमळ जवळ एकत्र येते. हे एकत्र पाणी आता पंढरपूरकडे येत आहे. सध्या पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं वाळवंटातील सर्व मंदिरात पाणी शिरलं आहे.
चंद्रभागेत स्नान न करण्याचं आवाहन
विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करुन भाविक आनंद घेत आहेत. सध्या वीर धरणातून आणि उजनी धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात येणार पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई
देशाला स्वातंत्र्या होवून 15 ॲागस्ट रोजी 75 वर्षे पुर्ण होत आहेत. यंदा 15 ॲागस्ट हा स्वातंत्र्यदिन आजादी का अमृत महोत्सव म्हणून देशभरात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उजनी धरणाच्या 15 दरवाज्यांना ही विद्युत रोषणाई करण्यात आली आह. सध्या उजनी धरणातून एकूण 40 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.. यापैकी वीजगृहातून 1600 क्युसेक तर नदीपात्रात 1600 हजार क्सुसेकने विसर्ग सुरू आहे. उजनी धरण सध्या 102.67 टक्के म्हणजेच 118.67 टीएमसी भरले आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: