(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकळू घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे.
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली, तरी गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यांमध्ये पाऊस सुरुच आहे. शाहूवाडी तालुक्यामध्ये भूस्खलनची घटना झाल्यानंतर आता भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे गगनबावडा चौकात बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, करुळ घाटातून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे आज दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. राधानगरी धरणाचे सध्या 3 दरवाजे (5,6,7) उघडे आहेत. यामधून 4 हजार 284 क्युसेक विसर्ग पाण्यातून होत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत राजाराम बंधाऱ्यावर स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर दोन दिवसांपासून ओसरल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असली, तरी धोका पातळीला पोहोचलेली नाही. दुपारी 3 वाजता पंचगंगेची पातळी 41 फुट 7 इंचावर स्थिर आहे. आज दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील अजूनही 76 बंधारे पाण्याखाली आहेत.
पुण्यातही पावसाची हजेरी
पुणे जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी 18 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, वडज, घोड, चिल्हेवाडी, कलमोडी, चासकमान, भामा आस्केड, वाडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुणे जिल्हातील पाण्याची समस्या संपण्याची शक्यता आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. सर्व धरणात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग करण्यात येणार आहे.भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. मुळशी धरण जलाशय पातळीत देखील वाढ झाली आहे.
वीर आणि उजनी धरणातून विसर्ग सुरु
सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरण 100 टक्के भरल्याने भीमा आणि नीरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली असून वाळवंटातील मंदिरात पाणी शिरू लागलं आहे. सध्या लागून आलेल्या सुट्ट्या आणि पवित्र श्रावण महिना सुरु असल्याने रोज हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येत आहेत.
चंद्रभागेत स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन
विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करून भाविक आनंद घेत आहेत. सध्या वीर धरणातून 33 हजार क्युसेक विसर्गाने नीरा नदीत तर 30 हजार क्युसेक विसर्गाने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या धरणात येणार पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पाणी सोडण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागातील नागरिकांना स्पीकरवरून स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शिवाय कोयना धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 27 फुटांवर गेली आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरून दिल्या जात आहेत.