Jaydeep Apte: शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, जयदीप आपटेकडून पोलीस चौकशीत माहिती लपवण्याचा प्रयत्न
Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर खळबळ उडाली होती. जयदीप आपटेला फारसा अनुभव नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम नौदलाने कसे दिले, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी (Shivaji Maharaj Statue) मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांची पोलीस कोठडी मंगळवारी संपत आहे. त्यामुळे दोघांनाही आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. बांधकाम सल्लागार चेतन पाटील (Chetan Patil) याला तिसऱ्यांदा मालवण पोलीस न्यायलायासमोर हजर करणार आहेत. तर मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte) याला दुसऱ्यांदा न्यायल्यासमोर हजर करणार केले जाणार आहे. चेतन पाटील दहा दिवस पोलीस कोठडीत आहे. तर जयदीप आपटे पाच दिवस पोलीस कोठडीत आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप तपासात अनेक विसंगती असून आरोपी महत्वाची माहिती लपवत असल्याने पोलीस कोठडीची मागणी पोलीस आज न्यायालयात करणार आहेत.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र, 26 ऑगस्टला ब्राँझचा हा 28 फुटी पुतळा कोसळला होता. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे जवळपास 8 दिवस फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला कल्याणमधील त्याच्या घराबाहेरुन आपटेला ताब्यात घेतले होते.
जयदीप आपटे याच्या वकिलांनी त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी नौदलासह अन्य यंत्रणांनी पुतळ्याच्या कामाची चाचपणी आणि खातरजमा केली होती. यानंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कोणालाही दुखापत करण्याच्या अनुषंगाने पुतळ्याचे बांधकाम करण्यात आले नव्हते. या दुर्घटनेत कोणत्याही पर्यटकाला दुखापत झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात जयदीप आपटे याच्यावर लावण्यात आलेली हत्येचा प्रयत्न आणि शारीरिक दुखापतीसंदर्भातील कलमे गैरलागू असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते.
शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात गंजलेल्या साहित्याचा वापर करण्यात आल्याचा दावा सिंधुदुर्ग पोलिसांनी न्यायालयात केला होता. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे अवशेष जमा करण्यात आले होते. ते गंजलेले होते. पुतळा तयार करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते का,याचा तपास करावा लागेल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते.
आणखी वाचा
पोलिसांनी हाक मारताच जयदीप आपटेचं अवसान गळालं, रडत गयावया करायला लागला, जाणून घ्या A टू Z स्टोरी