Jaydeep Apte: पोलिसांनी हाक मारताच जयदीप आपटेचं अवसान गळालं, रडत गयावया करायला लागला, जाणून घ्या A टू Z स्टोरी
Jaydeep Apte: जयदीप आपटे डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क लावून आपल्या घरी येत होता. मात्र, इमारतीच्या गेटवरच पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतले. जयदीप आपटेची आता चौकशी होणार. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत काय माहिती देणार?
कल्याण: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी प्रमुख आरोप असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) 26 ऑगस्ट रोजी पडला होता. तेव्हापासून जयदीप आपटे (Jaydeep Apte) हा फरार होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. तसेच त्याला शोधण्यासाठी मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची पाच पथकं कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे त्यांच्या हाती लागला नव्हता. अखेर बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे स्वत:च कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.
जयदीप आपटे पोलिसांना नेमका कसा सापडला?
जयदीप आपटे हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करून दूध नाका परिसरात उतरला. यावेळी जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता. त्याच्या हातात दोन बॅग होत्या. टोपी आणि मास्क लावून जयदीप आपटे हा आपल्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात होता. मात्र, इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस कोणत्याही रहिवाशांना इमारतीमध्ये सोडत नव्हते.
जयदीप आपटे हा इमारतीपाशी आल्यावर पोलिसांनी त्याच्याकड आयडी कार्ड मागितले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला आणि घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या जयदीप आपटे रडायला लागला. पोलिसांनी त्याची समजूत काढत इमारती खालून ताब्यात घेतले.
घरात जाण्यासाठी जयदीप पोलिसांना आग्रह करत होता. मात्र, परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे इमारतीच्या खाली जयदीप आपटे याची आई आणि पत्नी पोलिसांच्या गाडीपर्यंत आले. पोलिसांनी जयदीप आपटेला घरात न जाताच इमारतीच्या खालूनच डीसीबी स्कॉडकडे नेले. सिंधुदुर्ग पोलीस जयदीप आपटेच्या मागावर होते. काहीवेळातच डीसीपी कार्यालयमध्ये सिंधुदुर्ग पोलीस पोहोचले. त्यानंतर डीसीपी कार्यालयामध्ये जयदीप आपटेची कसून चौकशी करण्यात आली. ही चौकशी संपल्यानंतर जयदीप आपटेला रितसर सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
आणखी वाचा