(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jaydeep Apte: पोलिसांनी सासुरवाडीत 'फिल्डिंग' लावली, पण जयदीप आपटे अचानक कल्याणच्या घरी अवतरला, अलगद पोलिसांच्या हाती लागला
Shivaji Maharaj statue in Sindhudurg: शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. हा पुतळा कल्याणमधील शिल्पकार जयदीप आपटे याने तयार केला होता. जयदीप आपटेला पोलिसांकडून अटक. शिवरायांच्या पुतळ्यासाठी निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप
ठाणे: राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखालील पोलिसांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटेला (Jaydeep Apte) कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले. यापूर्वी मालवण पोलिसांचे पथक जयदीप आपटे याच्या घरी आले होते तेव्हा घराला कुलूप होते. परंतु, बुधवारी जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटे याला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. तेव्हापासून जयदीप आपटे हा फरार होता. अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतरही पोलिसांना त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि गृहमंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती. पोलिसांनी जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. जयदीप आपटे इतके दिवस हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास पुढे सरकण्याची शक्यता आहे.
जयदीप आपटे हा पोलीस चौकशीत शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्राँझच्या पुतळ्याबाबत काय माहिती देणार, हे पाहावे लागेल. या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आणि पुतळ्यासाठी निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्याबाबत जयदीप आपटे काय बाजू मांडणार, हे बघावे लागेल. याशिवाय, जयदीप आपटे याला भारतीय नौदलाने शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम कोणाच्या माध्यमातून दिले, हेदेखील आता समोर येण्याची शक्यता आहे. मालवण पोलिसांकडून आता जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील (Chetan Patil) यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल. या चौकशीतून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना नेमकी कोणती चूक झाली, याचे कारणही समोर येऊ शकते.
पोलिसांची आपटेच्या सासुरवाडीला फिल्डिंग
गेल्या आठ दिवसांपासून मालवण पोलीस, कल्याण, ठाणे ग्रामीण पोलिसांची पाच पथकं जयदीप आपटेचा शोध घेत होती. जयदीप आपटे याची सासुरवाडी शहापूर असल्याने तो तिकडे लपून बसल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये शहापूर परिसरातील हॉटेल्स, लॉज, फार्म हाऊसची तपासणी केली होती. कल्याणमधील घराला टाळे दिसल्यानंतर पोलिसांनी जयदीप आपटेच्या पत्नीची तिच्या माहेरच्या घरी जाऊन चौकशी केली होती. तसेच जयदीप आपटेच्या आईचा जबाबही पोलिसांनी नोंदवला होता.
आणखी वाचा