Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात तुफान पाऊस, नद्यांचं पाणी पात्राबाहेर, मुंबई-गोवा महामार्ग 12 तासांपासून ठप्प
Rain updates in Konkan: नद्यांचं पाणी पात्राबाहेर आल्याने घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस सुरु आहे. कर्ली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
सिंधुदुर्ग: गेल्या काही तासांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक नद्यांना पूर आला आहे. तर मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai Goa Highway) गेल्या 12 तासांपासून ठप्प आहे. कर्ली नदीला (Karli River) पूर आल्याने कुडाळ मधील पावशी महामार्गावर पाणी आल्याने मुंबई- गोवा रस्ते वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या आहेत. याशिवाय, मालपे पेडणे भागात दरड कोसळल्याने या भागातील वाहतूकही वळवण्यात आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची कोंडी झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्गात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्गातील तेरेखोल नदी, कर्ली नदी, वाघोटन नदी इशारा पातळीच्या वर वाहत असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर वाहत आहेत. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले आहे. तर काही ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात आज मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जिल्यातील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. वैभववाडी मधील तीथवली येथे मुसळधार पावसामुळे घर कोसळलं. कुडाळ मधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीच्या पुराच्या पाण्यात रस्ता उखरून खड्डा पडल्याने 27 गावांचा संपर्क तुटला. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथे पुलावर पाणी आलं असतानाही बोलेरो गाडी घातल्याने तिघे जण वाहून गेले होते. रात्री त्यांना स्थानिक आणि प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले.
कोल्हापूर शहरात पावसाची विश्रांती, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
कोल्हापूरमध्ये जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 2 इंचापर्यंत पोहोचली आहे. एका दिवसात पाणी पातळी 3 फुटांनी वाढली. जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धोकादायक वाहतूक टाळण्याचं आवाहन केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातील मालपे पेडणे भागात पुन्हा दरड कोसळली. दरडीसह संरक्षक भिंत कोसळल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पेडणे शहरातून वळवली. मालपे- पेडणे घाटात पुन्हा दरड कोसळल्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरून होणारी वाहतूक वळविली आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.
आणखी वाचा
मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बँटिंग, रस्त्यांना तळ्याचं स्वरुप, कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ