(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...अन् सात दिवसानंतर झाली बिबट्या आणि बछड्यांची पुर्नभेट; रत्नागिरी वनविभागाच्या प्रयत्नांना यश!
ऑपरेशनबद्दल होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता खूप गुप्तता पाळण्यात आली होती. गर्दी होऊन त्याचा परिणाम हा या साऱ्या ऑपरेशनवर झाला असता. म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
रत्नागिरी : आई या शब्दातचं सारं काही आलं. आईसारखं ममत्व जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही. आईचं प्रेम, माया सर्वांना ठावूक आहे. आईचं आपल्या मुलांवरील प्रेम हे माणसांमध्ये ज्याप्रकारे दिसून येतं त्याप्रकारे ते प्राणी, पक्षांमध्ये देखील असते. याचा अनुभव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील विंध्यवासिनीच्या जंगलात अनुभवायला आला. बिबट्याची एक ते दीड महिन्यांची दोन बछडे आपल्या आईपासून वेगळी झाली होती. यावेळी चिपळूण येथील वनविभाग आणि प्राणीमित्रांच्या साथीनं या बछड्यांना त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सुरू झालेल्या या मिशनला यश देखील आलं असून मादी बिबट्या आपल्या बछड्यांना यशस्वीरित्या नैसर्गिक अधिवासात घेऊन गेली आहे. परिणामी सर्वांना हायसं वाटलं. त्यामुळे आई आणि तिला असणारं ममत्व हे प्राण्यांमध्ये देखील असतं याचा अनुभव यावेळी सर्वांनी अनुभवला. दरम्यान, हे मिशन यशस्वी झाल्यामुळे प्राणीमित्र आणि वनविभागाचं कौतुक केले जात आहे.
काय घडलं होतं? कशी झाली बछड्यांची आणि आईशी भेट!
कोकणातील घनदाट जंगलात रंगलेल्या आणि सुरू असलेल्या एका थरारक आणि महत्त्वाच्या अशा ऑपरेशनची ही कथा आहे. चिपळूण तालुक्यातील विंध्यवासिनी हे जंगल. दरम्यान, या जंगलापासून जवळच असलेल्या धामणवणे गावातील एका ओढ्यात बिबट्याची दोन बछडे स्थानिकांना 12 जानेवारी रोजी आढळून आली. त्यामुळे आसपासच्या भागात मादी बिबट्याचा वावर असल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर प्राणीमित्र आणि वनविभाग यांनी एकत्र येत आईपासून वेगळ्या झालेल्या बछड्यांना त्यांच्या आईपाशी पोहोचवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मिशनची आखणी झाली. ठरल्याप्रमाणे मोहिम देखील सुरू झाली. सापडलेली बछडे ही जवळपास दीड महिन्यांची होती. त्यामुळे त्यांची काळजी देखील घ्यावी लागणार होती. या बछड्यांची विषेश अशी काळजी वनविभागानं यावेळी घेतली. त्यासाठी ट्रॅप कॅमेरा लावत मादी बिबट्यांच्या हालचालींवर बारिक लक्ष देखील ठेवलं गेलं. या बछड्यांची आपल्या आईशी भेट होण्याकरता जवळपास सहा दिवसांचा अवधी गेला. दोन वेळा मादी बिबट्या आपल्या बछड्यांजवळून येऊन देखील गेली. पण, त्यावेळी मात्र तिनं बछड्यांना नेलं नव्हतं. अखेर तिसऱ्या वेळी मादी बिबट्या आपल्या बछड्यांना घेऊन गेली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. माया, प्रेम केवळ माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्ये देखील असतं. हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं. दरम्यान, वनविभागाच्या या मोहिमेच सर्वत्र चर्चा सध्या जोरात सुरू आहे. यावेळी मादी बिबट्याच्या साऱ्या हालचाली वनविभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
कमालीची गुप्तता!
वनविभागाच्या मदतीला यावेळी प्राणीमित्र देखील होते. या ऑपरेशनबद्दल होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता खूप गुप्तता पाळण्यात आली होती. गर्दी होऊन त्याचा परिणाम हा या साऱ्या ऑपरेशनवर झाला असता. म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पण, विंध्यवासिनीच्या जंगलात वनविभागाचं हे ऑपरेशन यशस्वी झालं.