Mahayuti Oath Taking Ceremony: महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Mahayuti government oath taking ceremony: महायुती सरकारचा शपथविधी कधी, किती मंंत्री शपथ घेणार, गेल्या टर्ममधील बहुतांश मंत्र्यांना पुन्हा संधी मिळू शकते
मुंबई: विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय मिळाल्यानंतर आता महायुतीने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत महायुती सरकारचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे. तर या तिघांसोबत एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.
महायुतीच्या संभाव्य सत्तावाटपाच्या फॉर्म्युलानुसार, गेल्या टर्ममधील बहुतांश मंत्र्यांना पुन्हा संधी मिळू शकते. मात्र, सरकारची प्रतिमा खराब करणाऱ्या मोजक्या मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो. सत्तावाटपात भाजपला सर्वाधिक 20, शिवसेनेला 12 ते 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांचे प्रत्यक्षात किती मंत्री शपथ घेणार, हे बघावे लागेल. उर्वरित मंत्रीपदांचा कोटा हा नंतरच्या विस्तारासाठी बाकी ठेवला जाऊ शकतो.
आता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी भाजपचे 13 ते 14 मंत्रीपदं शपथ घेऊ शकतात. तर शिंदे गटाचे 12 ते 13 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 ते 9 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती आहे. कोणते खाते कोणाच्या वाट्याला जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. महायुतीच्या मुंबईतील बैठकीत याबाबत निर्णय होईल, अशी माहिती आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हेच महायुती सरकारचे मुख्यमंत्री असणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. आता त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात येऊन विधिमंडळ गटनेता आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील, अशी माहिती आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर नव्या सरकारमध्ये अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री असतील. परंतु, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही, हे बघावे लागेल. एकनाथ शिंदे यांना भाजपने केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातच राहावे, असा शिंदे गटाच्या नेत्यांचा आग्रह आहे. परंतु, एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये सामील न होण्याच्या विचारात आहेत, अशीही चर्चा आहे. तसे घडल्यास शिंदे गटाकडून कोणाला उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार, हेदेखील बघावे लागेल.
महायुतीच्या चर्चेत मंत्रीपदासाठी कोणता फॉर्म्युला निश्चित झाला?
भाजप 20 मंत्रीपद
शिवसेना 12 ते 13
राष्ट्रवादी 9 ते 10
आणखी वाचा