Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अमित शाह यांच्याकडे 12 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली.
Sanjay Raut on Eknath Shinde : राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवारांसह (Ajit Pawar) इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 12 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली. तसेच विधान परिषदेचे सभापतीपद, गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे.
संजय राऊत म्हणाले की, प्रचंड बहुमत असताना सुद्धा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आठ-आठ दिवस लागत आहेत. मुख्यमंत्री ठरला असेल तर आम्ही स्वागत करू. आम्हाला निकाल मान्य नसला तरी आकडे महत्वाचे असतात. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. गांधीवादी नेते बाबा आढाव यांना वयाच्या 95 व्या वर्षी आंदोलन करावे लागत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? पोलीस महासंचालक कोण असेल? मुंबई आयुक्त कोण असाव? हे दिल्लीतून मोदी आणि शाह ठरवत आहेत आणि महाराष्ट्राचे नेतृत्व मान झुकवून उभे आहे.
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही
महायुतीत ते तीन पक्ष एकत्र आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 50 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांना 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पदाचे वाटप कसे करावे हा त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे संरक्षण मंत्रीपद मागू शकतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपद मागू शकतात. मात्र, दिल्लीने डोळे वटारले तर त्यांच्याकडे काही पर्याय नसेल. त्यांना जे हवे आहे ते मागतील पण मिळालं नाही तरी ते सरकारमध्ये पडून राहतील. भाजपला जे काम करून घ्यायचं होतं ते झालेलं आहे. महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे. भविष्यात यांचे पक्ष फुटले तर आश्चर्य वाटू नये, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक
काल एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. ज्यात एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून आली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मावळता सूर्य आणि उगवता सूर्य यात फरक असतो. उगवत्या सूर्याचे तेज असते, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
राऊतांचा अजित पवारांवर निशाणा
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, अजित पवार कायम उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार काल गॉगल वगैरे लावून फिरत होते. त्यांचा चेहरा लोकसभेनंतर उतरला होता. आता त्यांचे चेहरे फुलले आहेत. ईव्हीएमची त्यांनी पूजा केली पाहिजे. त्यांनी एक मंदिर ईव्हीएम आणि दुसरं मंदिर मोदी-शाह यांचे बांधावे, अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.
आणखी वाचा